मिठाई, ड्रायफ्रूट, म्युझिकल ग्रीटिंगची चलती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे - दिवाळी म्हणजे आनंदोत्सव... या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येकजण आपले आप्तेष्ट आणि मित्र-मैत्रिणींना भेटवस्तू देतो. या वर्षी विविध भेटवस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. कोणी डायफ्रूटचा बॉक्‍स घेत आहे, तर कोणी चॉकलेट बुकेद्वारे मित्रांना शुभेच्छा देणार आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी म्युझिकल ग्रीटिंग कार्ड, तसेच वेगवेगळ्या डिझाइनमध्ये सजवलेला मिठाईचा बॉक्‍स... अशा विविध वस्तूंना मागणी वाढली आहे. ऑनलाइन संकेतस्थळांद्वारे भेटवस्तू ऑर्डर केल्या जात आहेत.

पुणे - दिवाळी म्हणजे आनंदोत्सव... या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येकजण आपले आप्तेष्ट आणि मित्र-मैत्रिणींना भेटवस्तू देतो. या वर्षी विविध भेटवस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. कोणी डायफ्रूटचा बॉक्‍स घेत आहे, तर कोणी चॉकलेट बुकेद्वारे मित्रांना शुभेच्छा देणार आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी म्युझिकल ग्रीटिंग कार्ड, तसेच वेगवेगळ्या डिझाइनमध्ये सजवलेला मिठाईचा बॉक्‍स... अशा विविध वस्तूंना मागणी वाढली आहे. ऑनलाइन संकेतस्थळांद्वारे भेटवस्तू ऑर्डर केल्या जात आहेत. विविध कंपन्याही पणत्यांचे बॉक्‍स, ड्रायफ्रूटचे बॉक्‍स, डायरी-पेन सेट आणि की-चेन अशा वस्तू कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी ऑर्डर करत आहेत. 

विविध संदेशांनी नटलेली रंगीबेरंगी दिवाळी भेटकार्डे लोकांच्या पसंतीस पडत आहेत. त्यात म्युझिकल ग्रीटिंग कार्ड आणि मिनी ग्रीटिंग कार्डना सर्वाधिक मागणी आहे. त्याशिवाय डायफ्रूट, चॉकलेट, फ्रूट आणि मिठाईच्या बॉक्‍सनाही पसंती मिळत असून, आयटी कंपन्यांकडून  कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी हे बॉक्‍स ऑर्डर केले जात आहेत. याबरोबर देवी-देवतांच्या मूर्तींसह मनमोहक आणि डिझायनर पणत्या- दिवे भेट देण्यालाही पसंती मिळत आहे. 

वॉल फ्रेम, देवी-देवतांचे छायाचित्र असलेल्या फ्रेम्स, वॉल हॅंगिंग, की-चेन, डायरी-पेन सेट अशा अनेक भेटवस्तू विकत घेतल्या जात आहेत. भेटवस्तू ऑनलाइन ऑर्डर करणाऱ्यांची संख्या अधिक असून, महिलांना भेट देण्यासाठी परफ्यूम, सौंदर्यप्रसाधने, घड्याळ, पर्स, दागिने आणि की-चेनची मागणी होत आहे. तर पुरुषांसाठी परफ्यूम, की-चेन, डायरी-पेन सेट, सनग्लासेस आणि घड्याळे ऑर्डर केली जात आहेत. देवी-देवतांचे छायाचित्र असलेली चांदीची नाणी, कलरफुल मेणबत्तीचा बॉक्‍स, रांगोळी स्टिकर्स, आर्टिफिशल मग यासह गिफ्ट व्हाउचर देण्याचेही लोकांचे नियोजन आहे.  

याबाबत वृषभ जैन म्हणाला, ‘‘मी माझ्या मित्र-मैत्रिणींना यंदा चॉकलेटचा बॉक्‍स गिफ्ट करणार आहे. त्यासाठी मी ऑर्डर दिली असून, चॉकलेट बॉक्‍सची डिझाइन्स खूप आवडली. या वर्षी ऑनलाइन संकेतस्थळावर भेटवस्तूंचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.’’

गिफ्ट बॉक्‍सची चलती
मित्र-मैत्रिणींना भेट देण्यासाठी वेगवेगळ्या डिझाइनमधील गिफ्ट बॉक्‍स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. आपण विकत घेतलेल्या वस्तू या गिफ्ट बॉक्‍समध्ये पॅक करून लोकांना देता याव्यात, म्हणून त्यांना लोकांची पसंती मिळत आहे. डायफ्रूट असो वा मिठाई या बॉक्‍समध्ये पॅक करून भेट दिल्या जात आहेत.

ऑनलाइन सेलिब्रेशन हॅंपर
दिवाळीसाठी ऑनलाइन संकेतस्थळांवर खास गिफ्ट आर्टिकल्स उपलब्ध आहेत. संकेतस्थळांनी दिवाळी सेलिब्रेशन हॅंपर आणले आहेत. पाच विविध वस्तूंचा समावेश असलेल्या या हॅंपरना लोकांची पसंती मिळत आहे. 

चॉकलेट बॉक्‍सना मागणी
दिवाळी म्हटल्यावर आपल्या मित्र-मैत्रिणींना गिफ्ट देण्याचा ट्रेंड आहे. यंदा मित्र-मैत्रिणींना भेट देण्यासाठी चॉकलेट बॉक्‍सची मागणी युवक-युवतींकडून होत आहे. वेगवेगळ्या फ्लेवर्समधील चॉकलेट्‌स आकर्षक बॉक्‍समध्ये पॅक करून आपल्या मित्र-मैत्रिणींना देण्याचे नियोजन युवकांनी केले आहे.