मंदीचे सावट असतानाही अंकांची ‘दिवाळी’

मंदीचे सावट असतानाही अंकांची ‘दिवाळी’

पुणे - सध्या सर्वच क्षेत्रांत मंदीचे सावट असतानाही दिवाळी अंकाच्या बाजारपेठेची यंदा दहा कोटी रुपयांच्या विक्रीचा आकडा गाठण्याकडे जोरदार वाटचाल सुरू आहे. गेल्या वर्षी सुमारे आठ कोटी रुपयांचा आकडा गाठला होता. यंदा त्यात दोन कोटी रुपयांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, प्रत्यक्षात दिवाळी संपली तरी दिवाळी अंकांच्या रूपानं तिची झळाळी बाजारपेठेत अजूनही तेवढीच आहे. अंकविक्रेते व एजन्सीचालकांनी बाजारपेठेतील या वेळचे बदल टिपताना ही माहिती दिली.

नवीन वस्त्रालंकार, पक्वान्नं, आतषबाजीबरोबरच शहरी मध्यमवर्गीय मराठी माणसांच्या घरात दिवाळी अंकांचंही खास महत्त्व असतं. राज्यात यंदा सुमारे ३५० दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध होते. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या अंकांव्यतिरिक्त छोट्या शहर किंवा तालुक्‍यांमध्ये स्थानिक पातळीवर काढल्या जाणाऱ्या अंकांची संख्याही ३५० च्या आसपास असल्याचं निरीक्षण रमेश राठिवडेकर यांनी नोंदवलं.

चैतन्य खरे म्हणाले, ‘‘यंदा दिवाळीच्या आदल्या दिवसापर्यंत पाऊस होता. मात्र ऐन दिवाळीच्या चार-पाच दिवसांत पावसानं उसंत घेताच ग्राहकांनी दमदार खरेदी केली. एका दृक्‌श्राव्य वाहिनीनं पहिल्यांदाच काढलेल्या अंकांच्या जाहिरातीचा छोट्या पडद्यावरून धडाका लावला. त्यामुळे खरेदीदारांची लाट उसळली. त्यात नव्याने आलेल्या ग्राहकांनी दुसरे अंकही घेतले.’’

श्रीकांत भुतडा यांनी सांगितलं, की दिवाळीअंकांची विक्री तुलसीविवाहापर्यंत चालते. आता अंतिम टप्प्यात आलेली विक्रीही दिमाखदार आहे. दिवाळीच्या सुटीत बाहेरगावी गेलेले खरेदीदार परतू लागले आहेत. त्यातून हा आठवडा पगार मिळण्याचा असल्यामुळे उत्तम विक्रीची अपेक्षा आहे. सुटीनंतर सुरू होणाऱ्या बऱ्याचशा शाळांच्या वाचनालयांसाठीही आता अंकखरेदी चाललेली आहे.

केवळ दिवाळी अंकांपुरत्या असलेल्या वाचनालयांची संख्या दुपटीनं वाढून पंचेचाळीसच्या आसपास गेली आहे. ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळं, निवासी सोसायट्या, नोकरदारांचे गट व पुस्तकभिशी चालविणाऱ्यांकडूनही दिवाळी अंकांचे गट्ठे विकत घेण्याचं प्रमाण वाढल्याचं एजन्सीचालकांनी सांगितलं.

बाजारपेठेचा बदललेला चेहरा 
समकालीन नवनव्या विषयांवर भर
विनोदविषयक खास अंक मागे पडले
प्रथमच दिवाळी अंक घेणारा मोठा तरुणवर्ग
विशिष्ट अंक मिळेपर्यंत ग्राहकांचे हेलपाटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com