पुस्तकातून उलगडले ‘ज्ञानप्रकाश’चे जग

पुस्तकातून उलगडले ‘ज्ञानप्रकाश’चे जग

पुणे - गेल्या शतकातील मराठी वृत्तपत्रांपैकी महत्त्वाचे वृत्तपत्र असलेल्या ‘ज्ञानप्रकाश’चे स्वरूप उलगडून दाखविणारे डॉ. अनुराधा कुलकर्णी लिखित ‘ज्ञानप्रकाश १८४९-१९५० : महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार’ हे पुस्तक ‘सकाळ प्रकाशना’ने नुकतेच प्रकाशित केले आहे. ‘ज्ञानप्रकाश’च्या निमित्ताने भारताच्या, विशेषत: महाराष्ट्राच्या १०१ वर्षांतील इतिहासाची एक रंजक झलक या पुस्तकामधून वाचायला मिळते. 

‘ज्ञानप्रकाश’चा जीवनकाळ (१८४९-१९५०) हा नवभारताच्या घडणीचा काळ होता. हा काळ विविध वैचारिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींनी भरलेला होता. परस्परविरोधी विचारप्रवाह आणि जुन्या-नव्याचा संघर्ष यांमुळे भारतीय समाज जणू ढवळून निघाला होता. या संक्रमणकाळाचे चित्रण ‘ज्ञानप्रकाश’मध्ये दिसते. 

‘ज्ञानप्रकाश’चा आढावा घेणाऱ्या प्रस्तुत ग्रंथात, मुद्रणकलेचा उदय, भारतातील प्रारंभिक वृत्तपत्रे, मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचा मागोवा सुरवातीच्या प्रकरणातून घेण्यात आलेला आहे. ‘ज्ञानप्रकाश’चे अंतरंग उलगडून दाखविताना, आजच्या पत्रकारितेवरही प्रभाव टाकणारी त्याची मूल्ये, त्यातील महत्त्वाचे अग्रलेख, त्याचे संपादक, त्याच्या वर्गणीदारांची यादी देण्यात आली आहे. तत्कालीन समाजाचे, सांस्कृतिक, सामाजिक घडामोडींचे चित्रण ‘ज्ञानप्रकाश’मधून कसे घडते त्याची उदाहरणे दिलेली आहेत. आर्थिक घडामोडींचा आढावा घेताना, औद्योगिक प्रगती, नवीन कररचना, चलनापासून मिठावरील करापर्यंत कितीतरी विषय चर्चिले गेले आहेत. त्यात उद्योगधंद्यांचाही समावेश आहे. ‘ज्ञानप्रकाश’मधील जाहिरातींमधून दिसणारे समाजचित्रण रंजक आहे. ‘ज्ञानप्रकाश’ पुण्यातून प्रसिद्ध होत असल्याने तत्कालीन पुण्याशी संबंधित बातम्यांचा विशेष आढावाही आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्ग बांधणीविषयक बातम्या, १८५७च्या उठावाविषयीच्या भारतभरातील बातम्या, यंत्रमाग, तारायंत्र, रेल्वे अशा नवनव्या सुधारणांमुळे जनसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांसंबंधीच्या बातम्या, वेगवेगळ्या नाटक-सिनेमांच्या, यंत्रांच्या, प्रसाधनांच्या जाहिराती यातून वाचकाला इतिहासाची झलक मिळते. 

डॉ. कुलकर्णी यांचा हा ग्रंथ सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना तसेच वृत्तपत्रांशी संबंधित असणाऱ्यांना उपयुक्त आहेच; शिवाय शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या बातम्यांची रंजक माहिती असल्यामुळे सर्वसामान्य वाचकालाही आवडेल असा आहे. इतिहासामध्ये रुची असणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही असावा अशा या ग्रंथाचे मूल्य ४५० रुपये आहे; मात्र ‘सकाळ वाचक महोत्सवा’निमित्त विशेष सवलतीत ३४० रुपयांना उपलब्ध आहे.

सकाळ प्रकाशनाची पुस्तके प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे, ‘सकाळ’ कार्यालयात व www.sakalpublications.com वर उपलब्ध आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क- ०२०-२४४०५६७८ किंवा ८८८८८४९०५०(सकाळी १० ते सायंकाळी ६)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com