दूध ओतू नका, भाज्या फेकू नका - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

पुणे - शेतकऱ्यांच्या तीव्र भावना मी समजू शकतो. मात्र, रस्त्यावर दूध ओतून देणे, भाजीपाला, फळे फेकून देऊन वाया घालवू नका. त्यापेक्षा गोरगरिबांना वाटप करा,’’ असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 

गोरगरिबांना वाटप केल्यास गावातील सामान्य लोकांसोबत आपली नाळ घट्ट होईल. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे संप नक्की यशस्वी होईल, अशी मला खात्री असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे शेतीमालाला किंमत देण्याचे आश्‍वासन दिले होते; पण निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्या. त्या आश्‍वासनांची अंमलबजावणी आणि मागण्यांची पूर्तता सरकारने तातडीने करावी, असेही त्यांनी नमूद केले.

अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबतचे संकेत देऊन राज्य सरकार संपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे; पण शेतकरी बांधवांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.