राष्ट्रपतिपदाला नकार देऊ नये - प्रतिभा पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

पुणे - ‘‘देशाच्या राष्ट्रपतिपदाकरिता शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. पण ते नकार देत असल्याचे मी ऐकले आहे. त्यांनी नकार देऊ नये,’’ असा सल्ला माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी माजी कृषिमंत्री शरद पवार यांना दिला. 
देशात प्रथम राज्यात महिला धोरण लागू केल्याबद्दल आणि संसदीय कारकिर्दीस पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पाटील यांच्या हस्ते शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्यांनी पवार यांना हा सल्ला दिला. तेव्हा प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. पाटील यांनी भाषणातून अनेक किस्से सांगत पवारांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखविले.

पाटील म्हणाल्या, ‘‘विलक्षण घडामोडी आणि चढ-उतारांच्या राजकारणातील पन्नास वर्षे त्यांनी पूर्ण केली. अतिशय खडतर राजकीय प्रवासात त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले.’’

पवार म्हणाले, ‘‘दिलेले काम बारकाईने करण्याची दृष्टी महिलांना उपजत असते. समाज पुढे न्यायाचा असेल, तर महिलांना अधिकार दिले पाहिजेत. संधी दिली तर महिला आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवू शकतात. म्हणून महिला आरक्षण, मालमत्तेत मुलीला निम्मा वाटा, सातबाऱ्यावर पत्नीचे नाव, लष्करात महिला आरक्षण हे निर्णय घेतले. शेतकरी आत्महत्यांमुळे ज्या विधवा होणाऱ्या भगिनींचे जीवन सुसह्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.’’

या वेळी माजी केंद्रीय सचिव राधा सिंग यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, शां. ब. मुजुमदार, सौ. प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, रजनी पाटील, ॲड. वंदना चव्हाण, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांच्यासह माजी महापौर उपस्थित होत्या.

‘आयसीएसई’ बोर्डाच्या परीक्षेत देशात पहिली आलेली मुस्कान पठाण हिचा प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोकसभा आणि विधानसभेतही पन्नास टक्के महिला आरक्षण द्यावे, हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले.

राज्यकर्त्यांनी शहाणपणा दाखवावा
राज्यातील शेतकरी आजपासून संपावर गेले आहेत. त्याविषयी भाषणाच्या सुरवातीलाच पवार म्हणाले, ‘‘आज मी अस्वस्थ आहे. बळिराजा संकटात आहे. तो रस्त्यावर उतरून संघर्ष करतो आहे. त्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे. ग्राहकांनीही शेतकऱ्यांच्या हितासाठी शक्‍य ते करावे. राज्यकर्त्यांनी शहाणपणाचा निर्णय लवकर घ्यावा आणि खऱ्या अर्थाने बळिराजाचे राज्य आणावे, एवढीच अपेक्षा आहे.’’