गोळ्या झाडतो; पण स्वत:ला तपासत नाही - डॉ. अभय बंग

टिळक स्मारक मंदिर - ‘एमकेसीएल’च्या समारंभात विनोबा भावे यांच्यावरील ‘विनोबा डॉट इन’ या संकेतस्थळाचे गुरुवारी अनावरण झाले. या वेळी समोरील स्क्रीनच्या माध्यमातून संकेतस्थळावरील ‘दुर्मिळ विनोबा’ अनुभवताना (डावीकडून) विवेक सावंत, डॉ. अभय बंग, डॉ. राम ताकवले,
टिळक स्मारक मंदिर - ‘एमकेसीएल’च्या समारंभात विनोबा भावे यांच्यावरील ‘विनोबा डॉट इन’ या संकेतस्थळाचे गुरुवारी अनावरण झाले. या वेळी समोरील स्क्रीनच्या माध्यमातून संकेतस्थळावरील ‘दुर्मिळ विनोबा’ अनुभवताना (डावीकडून) विवेक सावंत, डॉ. अभय बंग, डॉ. राम ताकवले,

पुणे - ‘‘बुद्ध असो किंवा ख्रिस्त, ज्ञानेश्‍वर असो किंवा तुकाराम, गांधी असो किंवा विनोबा हे आपल्याला सहन होत नाहीत. काहींना आपण बदनाम करतो. खाली ओढून त्यांची वस्त्र फाडतो. आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून दोषी ठरवतो. सुळावर चढवतो. काहींवर गोळ्यासुद्धा झाडतो; पण स्वत:ला तपासून पाहत नाहीत. दोन हजार वर्षांनंतर समाजात आजही तीच मानसिकता आहे,’’ अशी खंत सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) समारंभात विनोबा भावे यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘विनोबा डॉट इन’ या संकेतस्थळाचे अनावरण डॉ. बंग यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी सामाजिक सद्य:स्थितीवर बोट ठेवले. शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले, संकेतस्थळाचे समन्वयक-प्रकाशक डॉ. पराग चोळकर, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, उदय पंचपोर उपस्थित होते.

विनोबांच्या आठवणी उलगडत त्यांच्या विचारांचे महत्त्व सांगताना डॉ. बंग म्हणाले, ‘‘मी माझ्या जन्मापासून विनोबांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या सोबत होतो. त्यांनी स्थापन केलेल्या शाळांत शिकलो. आश्रमात वाढलो. लहानपण त्यांचे बोट धरूनच गेले. पुढे विनोबांचा सहवास वाढत गेला आणि आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध झाले. विनोबा हे ज्ञानयोगी आणि कर्मयोगीही होते. महाराष्ट्रातील साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक हे विनोबांच्या लेखन शैलीच्याच प्रेमात पडल्याने त्यांचा विचारांचे मर्म दुर्लक्षित राहिले.’’ ‘गीताई’, ‘मधुकर’ यापलीकडच्या त्यांच्या विपुल साहित्याचा नीट अभ्यास झाला नाही. विनोबा स्वतः ‘अदृश्‍य’ राहण्याच्या कलेत माहीर होते. त्यामुळे ते काय उंचीचे होते, हे महाराष्ट्राला कळले नाही, असेही ते म्हणाले.

विनोबांना नव्याने समजून घेण्याची गरज
‘आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधींचा विरोध करा’, असे आपण अनेकजण विनोबा भावे यांना सांगत होतो. त्यांनी इंदिरा गांधींचा विरोध केला नाही. म्हणून आपण विनोबांना खाली ओढले. ‘मौनी बाबा’च नव्हे ‘सरकारी संत’सुद्धा म्हटले; पण त्यांचे सत्य, अहिंसा ही मूल्य महाराष्ट्राला कळली नाहीत. कारण आपण कोत्या मनोवृत्तीचे होतो. इतरांप्रमाणेच मीही त्या वेळी विनोबांचा विरोध केला. त्यांच्या कुटीसमोर उभे राहून निषेध केला; पण इतक्‍या वर्षांनंतर महाराष्ट्राने आपली चूक मान्य करून विनोबांना नव्याने समजून घ्यायची वेळ आली आहे. विनोबा मातृहृदयी होते. ते नक्कीच आपल्याला आईसारखं जवळ घेतील, अशा भावनाही डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केल्या.

हिंदू शब्द सध्या चांगलाच चर्चेत आहे; पण ‘हिंसेने ज्याच्या हृदयाला दुःख होते तो हिंदू’, अशी व्याख्या विनोबांनी केली होती. ती आजच्या राजकीय, सामाजिक वातावरणात समजून घेणे जास्त गरजेचे आहे.
- डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com