पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पत्नीचे आरोपींशी अनैतिक संबंध असल्याची माहिती प्रवीणला मिळाली. प्रवीण व नातेवाइकांनी तीन जुलै रोजी तिला समजावून सांगितले होते.

पुणे : पत्नीच्या अनैतिक संबंधांना प्रतिबंध करण्यात अपयश आल्यामुळे पतीनेच गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. नऱ्हे येथे 17 जुलै रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण ज्ञानेश्‍वर निंबाळकर (वय 39, रा. रॅलीकॉन सोसायटी, नऱ्हे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पत्नीला वारंवार समजावून सांगितल्यानंतरही तिने इतर दोघांच्या मदतीने त्रास दिल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी प्रवीण यांचे मोठे भाऊ प्रशांत निंबाळकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रवीणची पत्नी तसेच नितीन पोपट भोईटे (रा. वाघोली) आणि गणेश सुखदेव रनावरे (रा. मंडई, पुणे) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रवीण हा इलेक्‍ट्रिकल डिप्लोमा केल्यानंतर पुण्यात नोकरी करत होता. प्रवीण आणि आरोपी महिलेचा 2006 मध्ये विवाह झाला होता. त्यांना अकरा वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर 2014 मध्ये आरोपी नितीन आणि गणेश यांच्यासोबत महिलेची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात नियमितपणे बोलणे सुरू झाले. पत्नीचे आरोपींशी अनैतिक संबंध असल्याची माहिती प्रवीणला मिळाली. प्रवीण व नातेवाइकांनी तीन जुलै रोजी तिला समजावून सांगितले होते. त्या वेळी नितीन व गणेश यांच्याशी बोलणार नाही, असे आश्‍वासन तिने प्रवीणला दिले; परंतु पुन्हा त्याच्याशी बोलणे सुरूच ठेवले. त्यानंतर आरोपी व पत्नीने प्रवीण यांना त्रास देण्यास सुरवात केली. आरोपींनी प्रवीण यांना दमदाटीही केली होती. पत्नीने मानसिक छळ सुरू केल्यामुळे प्रवीण यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अत्यंविधी झाल्यानंतर प्रवीण यांच्या भावाने पोलिसांकडे तक्रार दिली व त्यानुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.