आकर्षक रोषणाईने बाजारपेठ सजली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

चिनी वस्तूंपेक्षा भारतीय बनावटीच्या विद्युत रोषणाईला यंदा अधिक पसंती मिळत आहे. स्वदेशी वस्तूंमध्ये जास्त प्रकार नसले तरी उपलब्ध वस्तू खरेदी करण्यालाच ग्राहक प्राधान्य देत आहेत

पुणे - फुले, बदाम, डमरूच्या प्रकारांमधील एलईडी बल्बच्या रंगीबेरंगी माळा, 50 ते 100 बल्बच्या माळा, फ्रेडकलर, पारलाइट्‌स, झालर, मोर, चक्र यांसारख्या नावीन्यपूर्ण वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. यंदा भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असून, "लायटिंग मार्केट'मधील चिनी वस्तूंकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

गणपती घरगुती असो किंवा सार्वजनिक मंडळाचा. हा उत्सव अधिकाधिक प्रकाशित करण्यासाठी भाविक आकर्षक विद्युत रोषणाई करण्यावर भर देतात. त्या दृष्टीने विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी वाढत आहे.

विद्युत रोषणाईच्या बाजारपेठेमध्ये यंदा भारतीय वस्तू नव्याने दाखल झाल्या आहेत. एलईडी, दहा ते शंभर वॉटच्या सिंगल-मल्टिकलर फ्रेड लाइट्‌स, झालर यासारखे प्रकार उपलब्ध आहेत. सर्वाधिक पसंती एलईडी बल्बच्या माळांना मिळत आहे. याबरोबरच रोबलाइट्‌स, लेझर लाइट्‌स, पारलाइट्‌स, रोटरेटिंग लॅम्प, चक्र, एलईडी फोकस, एलईडी स्ट्रीप सेट, पळे, फुले व पानांची तोरणे, छोटी-मोठी झाडे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तीन रंग, सहा रंग ते सोळा रंगाच्या एलईडी स्ट्रीप सेटलाही जास्त मागणी आहे. याच्या किमती 25 रुपयांपासून अगदी पाच-दहा हजार रुपयांपर्यंत आहेत.

चिनी वस्तूंपेक्षा भारतीय बनावटीच्या विद्युत रोषणाईला यंदा अधिक पसंती मिळत आहे. स्वदेशी वस्तूंमध्ये जास्त प्रकार नसले तरी उपलब्ध वस्तू खरेदी करण्यालाच ग्राहक प्राधान्य देत आहेत.
- गोविंद भारती, इलेक्‍ट्रिकल्स विक्रेते

ग्राहक 50 व 100 बल्बच्या भारतीय बनावटीच्या विद्युत रोषणाईंनाच अधिक पसंती देत आहेत. स्वदेशी वस्तू महाग असल्या तरी त्या खरेदी केल्या जात असून, चिनी वस्तूंना यंदा मागणी नाही.
- विक्रम राठोड, इलेक्‍ट्रिकल्स विक्रेते

टॅग्स