नवउद्योजकांना बळ दिल्यास "जीडीपी' वाढ 

नवउद्योजकांना बळ दिल्यास "जीडीपी' वाढ 

पुणे - ""नावीन्यपूर्ण संकल्पना साकारणाऱ्या नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन, निर्मितीप्रक्रिया व बाजारपेठेचे तंत्र शिकविण्याबरोबरच प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नवउद्योजकांना बळ मिळाल्यास देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्येही (जीडीपी) वाढ होऊन अर्थकारणही बदलेल,'' असे मत पर्सिस्टंट सिस्टिमचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे यांनी व्यक्त केले. 

लायन्स फोरम फॉर इनोवेशन्सच्या वतीने सेनापती बापट रस्त्यावरील मुळगावकर सभागृहामध्ये "इनोवेशन एक्‍सपो 2017'चे आयोजन केले होते. या प्रदर्शनाच्या उद्‌घाटन प्रसंगी देशपांडे बोलत होते. डिस्ट्रिक्‍ट गव्हर्नर गिरीश मालपाणी, नरेंद्र भंडारी, फोरमचे अध्यक्ष रमेश शहा, हेमंत नाईक, तुषार मेहता, "सकाळ'चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार या वेळी उपस्थित होते. "सकाळ' या प्रदर्शनाचे माध्यम प्रायोजक आहे. 

देशपांडे म्हणाले, ""आपल्याकडे नावीन्यतेची कमतरता नाही. असंख्य नावीन्यपूर्ण संकल्पना आपल्याकडे आहेत. "स्मार्ट इंडिया'चा विचार करताना अशा संकल्पनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. नवउद्योजकांनीही उत्पादनाची प्रक्रिया, बाजारपेठ व अन्य आव्हानांचा टप्प्यानुसार अभ्यास केला पाहिजे. नवउद्योजक व लायन्स क्‍लबने नेमकी हीच गरज ओळखून हे प्रदर्शन भरविले आहे. नावीन्यपूर्ण संकल्पनांना बळ देणारी ही चळवळ पुढेही सुरू राहिली पाहिजे.'' नावीन्यपूर्ण संकल्पना मांडणारे भरपूर आहेत; मात्र गुंतवणूक करणारेही पाहिजेत. या दोन्ही घटकांमधील पोकळी भरून काढण्याचे काम "लायन्स'ने करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. 

मालपाणी म्हणाले, ""आपले आयुष्य हे नावीन्यपूर्ण संकल्पनांनी व्यापलेले आहे. मात्र त्या कल्पना सत्यात उतरविण्यासाठी एका व्यासपीठाची गरज होती, ते काम "इनोवेशन एक्‍सपो'द्वारे झाले आहे.'' 

शहा म्हणाले, ""नावीन्यता ही कोणत्याही एका क्षेत्रापुरती मर्यादित संकल्पना नाही. नावीन्याचा उद्देश सामान्य नागरिकांनाही माहीत असायला पाहिजे. त्यादृष्टीने हे व्यासपीठ तयार केले आहे. पुण्यात दहा हजार "इनोव्हेटर्स' आहेत. त्यांच्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त आहे.'' हे प्रदर्शन शनिवारी (ता.9) सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत खुले असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com