दाजीकाकांनी व्यवसायाचा मूलमंत्र दिला - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

पुणे - ""मराठी माणसाने व्यवसाय कसा करावा, हे दाजीकाका गाडगीळ यांनी शिकवले. व्यवसाय करून नाव कमावणे अवघड असते; मात्र तो आदर्श दाजीकाकांनी नवीन पिढीपुढे घालून दिला आहे,'' असे गौरवोद्‌गार पालकमंत्री गिरीश बापट यांनी काढले. 

पुणे - ""मराठी माणसाने व्यवसाय कसा करावा, हे दाजीकाका गाडगीळ यांनी शिकवले. व्यवसाय करून नाव कमावणे अवघड असते; मात्र तो आदर्श दाजीकाकांनी नवीन पिढीपुढे घालून दिला आहे,'' असे गौरवोद्‌गार पालकमंत्री गिरीश बापट यांनी काढले. 

दाजीकाका गाडगीळ यांच्या 103व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी गाडगीळ यांच्या स्मरणार्थ पीएनजी ज्वेलर्स तर्फे "थिंक प्युअर ऍवॉर्डस'चे वितरण करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, डॉ. शां. ब. मुजुमदार, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, कार्यकारी संचालक पराग गाडगीळ, संचालक विद्याधर गाडगीळ उपस्थित होते. 

विविध क्षेत्रांत स्वतःचे योगदान देऊन समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्तींना यात गौरविण्यात आले. ग्रीन थंब संस्थेचे लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील, डॉ. सोमनाथ पाटील (शिक्षण), शशांक परांजपे (उद्योग) यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. 

एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांना "जेम ऑफ पुणे' या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच सोनिया अगरवाल यांना "वूमन एम्पॉवरमेंट' आणि अभिनेते प्रशांत दामले यांना "परफॉर्मिंग आर्टस' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

टिळक म्हणाल्या, ""व्यवसाय करताना ग्राहकांशी ऋणानुबंध तयार करणे अवघड काम असते; मात्र दाजीकाकांनी ती लीलया पेलली. सातत्याने चांगल्या कामांना मदत करणे हा त्यांचा स्थायी भाव होता.''