चांगले काम करणारे प्रकाशात यावेत - डॉ. आमटे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

पुणे - ‘‘समाजात चांगले काम करणारे अनेक जण आहेत. त्यांना प्रकाशात आणले तर समाजातील इतर लोकांनाही चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळेल. मात्र, समाजासाठी काम करण्यापूर्वी समाजाच्या गरजा जाणून घेतल्या पाहिजेत,’’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

पुणे - ‘‘समाजात चांगले काम करणारे अनेक जण आहेत. त्यांना प्रकाशात आणले तर समाजातील इतर लोकांनाही चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळेल. मात्र, समाजासाठी काम करण्यापूर्वी समाजाच्या गरजा जाणून घेतल्या पाहिजेत,’’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टतर्फे चिमणशेठ गुजराथी यांच्या स्मृतीनिमित्त उद्योग आणि सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी उद्योगक्षेत्रासाठीचा ‘उद्यमगौरव पुरस्कार’ नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे प्रमुख विलास शिंदे, सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील मॅप्रो फुड्‌सचे किशोर व्होरा आणि मयूर व्होरा यांना प्रदान करण्यात आला, तर शैक्षणिक क्षेत्रासाठीचा ‘सेवागौरव पुरस्कार’ धुळे येथील घासकडबी शैक्षणिक संस्थेचे नरेंद्र जोशी यांना आणि वैद्यकीय क्षेत्रासाठीचा ‘सेवागौरव पुरस्कार’ अहमदनगर येथील स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मोहन गुजराथी, जयंत गुजराथी, कन्हैयालाल गुजराथी, सुभाषचंद्र देवी आणि डॉ. नलिनी गुजराथी आदी उपस्थित होते. डॉ. आमटे यांनी ‘दुर्लक्षित समाजघटकांच्या उत्कर्षाची हाक’ या विषयावर मार्गदर्शन केले. आमटे दाम्पत्याच्या कामाप्रती कृतज्ञता म्हणून प्रबोध समूहाच्या वतीने एक लाख रुपयांचा निधी त्यांना सुपूर्त करण्यात आला.

डॉ. आमटे म्हणाले, ‘‘ सध्या समाजातील हिंसाचाराबद्दल जास्त बोलले जाते. सर्वत्र वाईट कृत्येच घडताहेत असे दर्शविले जात आहे. मात्र, मी काम केलेल्या काळापासून आताचा काळ बराच सुधारला आहे. चांगल्या कामासाठी समाजातील तरुणाई मोठ्या संख्येने पुढे येत आहे. शहरी डॉक्‍टरांमध्येही आमच्या कार्याबाबत जागृती निर्माण झाली असून, शहरातूंन अनेक तज्ज्ञ डॉक्‍टरांचे समूह आमच्याकडे येऊन समाजसेवा करतात. आपल्या आयुष्याचा तरुणांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडत असल्याचे पाहूनदेखील समाधान वाटते.’’