गुरुमाहात्म्य अन्‌ विविध धार्मिक कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

पुणे - गुरुमाहात्म्य सांगणारे अवीट गोडीच्या गीतांचे सुर... मंदिरांना फुले आणि विद्युत रोषणाईची केलेली आकर्षक सजावट... कुठे रांगोळ्या, तर कुठे फुलांच्या पायघड्या... मंत्रोच्चारात सुरू असलेला अभिषेक, आरती, कीर्तने आणि व्याख्यानेही... अशा भावक्तीपूर्ण वातावरणात रविवारी शहरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व गुरुजनांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. 

आषाढ शुद्ध पौर्णिमेला येणाऱ्या गुरुपौर्णिमेसाठी शनिवारी मध्यरात्रीपासून शहरातील साई मंदिर, दत्त मंदिरांबरोबरच मठामध्ये तयारीची लगबग सुरू होती. आकर्षक विद्युत रोषणाईबरोबरच मंदिरांना रंगीबेरंगी फुलांनी सजविण्याचे काम रात्रीपासून सुरू होते. 

पहाटे मंदिरांमध्ये अभिषेक झाला. त्यानंतर भाविकांसाठी मंदिरे खुले करण्यात आली. पहाटेपासूनच विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. आरती, होमहवन, मंत्रोच्चार, जप, गुरुपूजन यासारखे धार्मिक विधी मंदिरांत पार पडले.

सहकारनगर येथील गजानन महाराज मंदिर, बुधवार पेठेतील श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, सातारा रस्त्यावरील शंकर महाराज मठ, गोंदवलेकर महाराज मठांबरोबरच शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील दत्त मंदिरे, साई मंदिरांमध्ये गुरू पौर्णिमेचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी आवर्जून उपस्थिती लावली. सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिरातील तळघर भाविकांसाठी खुले केले होते. गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून महाप्रसादाचेही आयोजन केले होते. काही मंदिरांमध्ये भजन, कीर्तन व व्याख्यानांचे आयोजन केले होते. 

बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरामध्ये फुलांची आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. उत्सवप्रमुख शिरीष मोहिते व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे पहाटे महापूजा करण्यात आली. दर्शनसाठी दिवसभर भाविकांची गर्दी होती.

शाळांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी 
नू. म. वि. प्रशालेत (मुलांची) गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सुभाष कुलकर्णी, दादासाहेब शिंदे, शैलेंद्र आपटे, मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे, उपमुख्याध्यापिका सरिता गोखले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रेणुका प्रशालेमध्येही विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी विद्यार्थ्यांना चायनीज वस्तू न वापरण्याची शपथ दिली.