बाप्पा रंगविणाऱया संदिपची इच्छापूर्ती होईल का?

जितेंद्र मैड
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

दीड महिन्याचा असल्यापासून संदिपला एक दुर्धर असा विकार झाला. त्यामुळे त्याच्या हालचालीला मर्यादा आल्या. जागेवर पडून राहून त्याला सर्व कामे करावी लागतात. आई, भाऊ व कुटूंबियांच्या पाठींब्यामुळे संदिप मूर्ती रंगवणे, पतंगा बनवणे अशी कामे करुन आपला उदरनिर्वाह चालवतो.

पुणे : अपंगत्वामुळे जागेवरुन हालताही न येणारा संदिप नाईक जागेवर पडल्या पडल्या गणेश मूर्ती रंगवणे, पतंग बनविणे अशा कामातून उदरनिर्वाह चालवतो. बाप्पाच्या सुरेख मुर्ती रंगविणाऱया संदिपला तांत्रिक अडचणीमुळे अपंगत्वाचे लाभ मिळवणे दुरापास्त झाले आहे. अपंगांसाठी असलेल्या एखाद्या तरी सरकारी योजनेचा लाभ मिळावा ही संदिपची इच्छापूर्ती होईल का? असा प्रश्न संदिप व त्याचे नातेवाईक करत आहेत.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे संदिपचे शरीर कमकुवत झाले आहे. उठून बसण्याने किंवा कोणी उचलून घेतले तरी संदीपचे हाड मोडू शकते. त्यामुळे त्याला झोपूनच सर्व कामे करावी लागतात. पण तो त्याची जिद्द हरला नाही. गणेश मूर्ती, गौराया रंगवणे, पतंग बनवणे अशी कामे करुन तो स्वाभिमानी आयुष्य जगत आहे. त्यामध्ये सीताराम खाडे, महाजन अशा काही व्यावसायिकांचेही सहकार्य लाभले. त्याच्या स्वावलंबी वृत्तीला पाठींबा म्हणून एखाद्या शासकीय योजनेचा लाभ मिळाला, तर त्याचे जीवन सुकर बनेल असे सर्वांना वाटते. अपंगांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. परंतु प्रमाणपत्र व लाभ मिळविण्यासाठी ज्या अटी आहेत त्या पूर्ण करणे सर्वच अपंगांना शक्य होत नाही. कोथरुडच्या सुतारदरा भागात राहणाऱ्या संदिपला शासकीय कचेरीत घेवून जाणे हे त्याच्या अपंगत्वाला आणखी त्रासदायक ठरण्याची भिती आहे. लाभ कणभर आणि त्रास मणभर करुन घेण्यापेक्षा त्या मार्गाला न गेलेलेच बरे असे संदिपच्या कुटूंबियांना वाटते.

संदिपची आई म्हणाली, अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासकीय अधिकारी मामलेदार कचेरीत घेऊन या असे सांगत आहेत. मात्र त्याला उचलले तर त्याची हाडे निसटतील, तुटतील अशी भिती डॉक्टर व्यक्त करत आहेत. अपंगत्वाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यासाठी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता आला नाही. संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज केला आहे. पण अजून काहीही मिळालेले नाही.
संदिप म्हणाला की, अपंगत्वामुळे शासन दरबारी जाता येत नाही अशांच्या घरी शासकीय अधिकाऱ्यांनी, डॉक्टरांनी जावून त्यांना जागेवर अपंगत्वाचे प्रमाणपत्र द्यावे. म्हणजे अपंगांचा त्रास कमी होईल. शासकीय योजनेतून मला एखादा व्यवसाय करण्यासाठी मदत, घरकुलासाठी अनुदान मिळाले तर खुप बरे होईल.

दीड महिन्याचा असल्यापासून संदिपला एक दुर्धर असा विकार झाला. त्यामुळे त्याच्या हालचालीला मर्यादा आल्या. जागेवर पडून राहून त्याला सर्व कामे करावी लागतात. आई, भाऊ व कुटूंबियांच्या पाठींब्यामुळे संदिप मूर्ती रंगवणे, पतंग बनवणे अशी कामे करुन आपला उदरनिर्वाह चालवतो. त्याच्या या जीवनाच्या लढाईत सरकारी योजनेची साथ मिळाली तर त्याच्या कुटूंबियांसाठी तो फार मोठा आधार होईल.