पावसामुळे वाढतोय संसर्ग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण हडपसर, धनकवडी, संगमवाडीत

पुणे - शहरात सध्या पावसाळी वातावरण आहे. कमाल तापमानाचा पारा सरासरीपर्यंत खाली आला आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. असे वातावरण स्वाइन फ्लूसह इतर इन्फ्लुएंझा विषाणूंच्या प्रसारासाठी पोषक असते. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, सर्वाधिक रुग्ण हडपसर, धनकवडी आणि संगमवाडीत आढळले आहेत.

स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण हडपसर, धनकवडी, संगमवाडीत

पुणे - शहरात सध्या पावसाळी वातावरण आहे. कमाल तापमानाचा पारा सरासरीपर्यंत खाली आला आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. असे वातावरण स्वाइन फ्लूसह इतर इन्फ्लुएंझा विषाणूंच्या प्रसारासाठी पोषक असते. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, सर्वाधिक रुग्ण हडपसर, धनकवडी आणि संगमवाडीत आढळले आहेत.

स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांचे विश्‍लेषण महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. शहराच्या सर्व भागात रुग्ण आढळत आहेत. घोले रस्ता, वारजे, टिळक रस्ता, भवानी पेठ या भागांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण इतर क्षेत्रीय कार्यालयांच्या तुलनेत कमी आहे; पण या रोगाचा एकही रुग्ण नाही, असा शहरातील एकही भाग नसल्याचे या विश्‍लेषणातून अधोरेखित झाले आहे. शहरात जानेवारीपासून ३८० रुग्णांना स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ या विषाणूचा संसर्ग झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे निरीक्षण यात नोंदविले होते. मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्येही यंदा स्वाइन फ्लूचे प्रमाण वाढले होते. कमाल आणि किमान तापमानातील तफावत मोठी असल्याने विषाणूंसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते, अशी माहिती त्याबाबत संसर्गजन्य रोगतज्ज्ञांकडून देण्यात आली.

दृष्टिक्षेपात पुण्यातील स्वाइन फ्लू 
(१ जानेवारीपासून)

तपासलेले रुग्ण - चार लाख ८५ हजार ७९१
मोफत औषध दिलेल्या रुग्णांची संख्या - ९ हजार ७८८
घशातील द्रवपदार्थ घेऊन वैद्यकीय तपासणी केलेले रुग्ण - एक हजार ५७८
स्वाइन फ्लूचे निदान झालेले रुग्ण - ३८०
उपचारानंतर रुग्णालयातून घरी गेलेले रुग्ण - २७८
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या - ८०
अत्यवस्थ रुग्ण - ११
रुग्णालयात दाखल - ११

महिना    स्वाइन फ्लूचे रुग्ण    मृत्यू
जानेवारी         ५                     २
फेब्रुवारी        २५                     २
मार्च             १२१                 २२
एप्रिल            ९८                  १७
मे                 ३८                   १२
जून              २६                     ४
जुलै              ६७                     २१
 

शहरात सात महिन्यांत ३८० रुग्ण
हडपसर, धनकवडी आणि संगमवाडी येथे स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याची माहिती पुढे आली असून, शहरात गेल्या सात महिन्यांमध्ये ३८० रुग्णांना याचा संसर्ग झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे मंगळवारी सांगण्यात आले.

पुण्याबाहेरील रुग्ण अधिक
जानेवारीपासून महापालिका हद्दीत १७२ रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले आहे; पण त्याहीपेक्षा जास्त धोका शहर आणि परिसरात वाढत आहे. तेथे २०३ रुग्णांना स्वाइन फ्लू झाला. त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. स्वाइन फ्लूने पुण्यातील २४ रुग्णांचा, तर पुण्याबाहेरील ५६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती कळविण्यात आली आहे. 

लक्षणे दिसताच उपचार करा
ताप, थंडी, डोकेदुखी, उलट्या अशी स्वाइन फ्लूची ठळक लक्षणे दिसताच पहिल्या दोन दिवसांमध्ये टॅमिफ्ल्यू हे औषध देण्याचे आवाहन आरोग्य खात्यातर्फे डॉक्‍टरांना करण्यात आले. तापाची इतर औषधे देऊनही रुग्णाला बरे वाटत नसल्यास तातडीने स्वाइन फ्ल्यूची औषधे द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

जोखमीचे रुग्ण कोणते?
हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, गर्भवती, स्थूल व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, मूत्रपिंड, यकृताचे विकार असलेल्या रुग्णांनी स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी लस घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हे करा 
वारंवार स्वच्छ पाणी व साबणाने हात धुवा
पौष्टिक आहार घ्या
भरपूर पाणी प्या

हे टाळा
हस्तांदोलन
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका

सध्या महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय, डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालय, सोनवणे आणि राजीव गांधी या रुग्णालयांमधून स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस उपलब्ध आहेत. शहरातील वातावरणामुळे हवेतून पसरणाऱ्या या रोगाच्या विषाणूंचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून चार हजार लस खरेदी करण्यात येत आहेत. महापालिकेच्या १९ रुग्णालयांमधून ही लस उपलब्ध केली जाईल.
- डॉ. अंजली साबणे, आरोग्य उपप्रमुख, पुणे महापालिका