'ही' खबरदारी घेतली असती तर आठ जीव वाचले असते...

राजकुमार थोरात
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

अकोले येथील बोगद्यामध्ये क्रेनचा वायर रोप तुटून झालेल्या अपघातामध्ये आठ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर या परिसरातील नागरिक हादरले आहेत.

वालचंदनगर : नीरा - भीमा नदीजोड प्रकल्पाचे इंदापूर तालुक्यातील अकोले, काझड परिसरामध्ये पाच ठिकाणी बोगद्याची कामे सुरू असून कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी घेतली नसल्यामुळे आठ कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिक नागरिक सांगत असून यापुढे प्रशिक्षित कामगार व सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याशिवाय बोगद्यातील पुढील काम सुरू करु नये, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे  सभापती प्रविण माने यांनी केली.

अकोले येथील बोगद्यामध्ये क्रेनचा वायर रोप तुटून झालेल्या अपघातामध्ये आठ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर या परिसरातील नागरिक हादरले आहेत. सभापती प्रविण माने यांनी आज अकोले येथील घटनास्थळी भेट देऊन बोगद्याचे काम करीत असलेल्या सोमा इंटरप्राईजेस या कंपनीच्या टेक्निकल इंजिनियर एस. एल. प्रसाद यांचेशी चर्चा केली.

माने यांनी सांगीतले की बोगद्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्यामुळे तीन सुपरवायझर, तीन पंप अॉपरेटर व दोन कामगारांना जीव गमवावा लागला . याविषयी ठेकेदाराने पुर्ण खबरदारी घेतल्याशिवाय पुढील कामे करु दिली जाणार नाहीत. असा इशारा माने यांनी दिला आहे. यावेळी नीलेश दराडे, गणेश दराडे, शामराव पाटील, कमलाकांत वणवे, दत्तात्रय दराडे, सचिन पवार, तुकाराम शिंदे, राजेंद्र शिंदे उपस्थित होते.  

Web Title: pune news indapur tunnel accident lives could be saved