"व्हायचेय जयांना या जगी मोठे ​त्या इमानी माणसांचे सोसणे चालू..."

दीपेश सुराणा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

इंदूरमधील गझलकार शोभा तेलंग यांची मराठी मातीशी नाळ 

पिंपरी : "व्हायचे आहे जयांना या जगी मोठे त्या इमानी माणसांचे सोसणे चालू'' असे गझलकार शोभा तेलंग आपल्या गझलमध्ये व्यक्त होताना म्हणतात. इंदूरमध्ये (मध्य प्रदेश) राहूनही त्यांनी मराठी कविता, गझल जोपासली आहे. गझलकार सुरेश भट यांच्याकडून गझलचे धडे गिरविणाऱ्या तेलंग या अद्याप महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडून आहेत. स्त्री गझलकार म्हणून होत असलेली अभिव्यक्ती त्यांना महत्त्वाची वाटते, असे त्यांनी "दै.सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

गझलकार तेलंग यांनी 1975 पासून काव्य लेखनाला सुरवात केली. तर, 1985 पासून त्या गझल लेखन करू लागल्या. काव्यसंग्रह, गझल, बालगीत संग्रह, बालगझल संग्रह अशी त्यांची आत्तापर्यंत एकूण 11 पुस्तके प्रकाशित आहेत. प्रेम, शृंगार, सामाजिक आणि राजकीय आशयाच्या गझलांचे त्यांनी लिखाण केले आहे. पिंपळेसौदागर येथे आल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आजपर्यंत झालेली साहित्यिक वाटचाल उलगडून सांगितली. 

तेलंग म्हणाल्या, "1995 मध्ये "आकाशफुले' हा माझा पहिला चारोळी संग्रह प्रकाशित झाला. गझलकार सुरेश भट, इलाही जमादार, डॉ. राम पंडित, ए.के.शेख (पनवेल) यांच्या मार्गदर्शनातून माझी साहित्यिक वाटचाल समृद्ध झाली. कवयित्री शांता शेळके, शंकर वैद्य, कवी मंगेश पाडगावकर, सुमित्रा महाजन अशा दिग्गजांची लेखन प्रवासात खूप मदत झाली. रवींद्र भट यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात कार्यक्रमासाठी बोलावून उभ्या महाराष्ट्राला माझी ओळख करून दिली. स्त्री गझलकार म्हणून माझी होत असलेली अभिव्यक्ती खूप महत्त्वाची आहे. "सुंदर गजला गाऊया' या गझल संग्रहात मी बालगझला लिहिल्या आहेत.'' 

गझलकार सुरेश भट यांच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, "दादांनी पत्राद्वारे मला खूप मार्गदर्शन केले. गझल लेखनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दहा ते पंधरा पानांचे पत्र ते मला पाठवीत असायचे. "एक बाप आपल्या लेकीला जेवढी मदत करतो, तेवढी सर्व मदत करेल. पण, तू आपला छंद सोडू नको'', असे "दादा' म्हणायचे. त्यांनी माझी गझल तंत्रशुद्ध केली.'' 
"मी इंदूरमध्ये वास्तव्यास असले तरी महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडून आहे. महाराष्ट्रातील कवी, लेखकांनी अन्य राज्यातील कवी, लेखकांनाही आपल्यातीलच समजावे,'' असे त्या स्पष्टपणे नमूद करतात. 

Web Title: pune news indore gazal writer shobha telang interview