बुद्धिभेद झालेल्या डोक्यात विज्ञानवाद कसा पोचणार?: जावेद अख्तर

स्वप्नील जोगी
रविवार, 20 ऑगस्ट 2017

जिथे प्रश्न विचारायला मुभा नसेल, ती जागा, तो देश, ते वातावरण निकोप कसे म्हणता येईल ?... अशा ठिकाणी केवळ 'पाप-पुण्याच्या' हिशेबात न अडकता लोक प्रबोधनाची आवश्यकता निर्माण होते. धर्माच्या आडून सत्ता राबवू पाहणाऱ्यांपासून आपण स्वतःला वाचवायला हवे.
- जावेद अख्तर

पुणे : "बुद्धिभेद झालेल्या डोक्यात विज्ञानवाद पोचू शकत नाही. परंपारांच्या आधीन गेलेले मेंदू समोर दिसणाऱ्या लखलखीत वैज्ञानिक सत्यालाही दुर्दैवाने नाकारतात. एकीकडे चंद्रावर यान पाठवणारे आपण दुसरीकडे मात्र हजारो वर्षांपासून सुरू असणाऱ्या धार्मिक अंधश्रद्धांना सोडत नाही आहोत, ही विसंगत मानवी वर्तणूक म्हणजे बहूव्यक्तिमत्त्वाच्या मनोविकृती पेक्षा वेगळे ते काय ?..." असा सडेतोड सवाल ज्येष्ठ शायर व गीतकार जावेद अख्तर यांनी उपस्थित केला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनास रविवारी (20 ऑगस्ट) चार वर्षे झाली, मात्र त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलेल्या 'जवाब दो' आंदोलनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात अख्तर बोलत होते.

ते म्हणाले, " अनेकजण सत्याच्या शोधात प्रवाहाविरुद्ध आपली दिशा ठरवतात. चांगल्यासाठी ते जग बदलू पाहत असतात. डॉ दाभोलकर हे अशीच एक व्यक्ती होते. जगाला एक नवा विचार त्यांनी देऊ पाहिला, पण आपल्या कर्मठ आणि परंपरांच्या जोखडात  रमणाऱ्या समाजाने हे समजून घेतलेच नाही."

नवा विचार हेच जगाच्या प्रगतीचे प्रमुख कारण नेहमीच राहिले आहे. मानवी उत्क्रांतीत याच 'नव्या विचारांचे' स्थान मोठे महत्त्वाचे आहे, हे नाकारून चालायचे नाहीच, असेही अख्तर म्हणाले. या वेळी डॉ श्रीराम लागू, डॉ शैला दाभोलकर उपस्थित होते.

... तरच होईल सामाजिक मुक्ती !
अख्तर म्हणाले, " काहीतरी 'ईश्वरी संकेत' आहे म्हणून किंवा मग कधीतरी 'मनःशांती वगैरे मिळते' म्हणून अवैज्ञानिक किंवा अंधश्रद्धांना खतपाणी देणाऱ्या गोष्टींना भरीस पडणे, हे योग्य नाही. डोळे उघडून बुद्धीचा वापर करत याकडे पाहायला हवे. त्यातूनच सामाजिक मुक्तीचा मार्ग आहे."

'हे' भारताचं वेगळेपण
अख्तर म्हणाले, " जगात जिथे जिथे धर्म प्राबल्य आहे, अशा प्रत्येक ठिकाणी अन्याय, हिंसा, अत्याचार वास करून आहेत. आपला देश मात्र त्यापेक्षा वेगळा म्हटला जातो, तो इथल्या धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्थेमुळे. आज मात्र हीच ओळख पुसट होत चालली आहे. लक्षात ठेवा- जेव्हा समाजात विषवल्ली पसरू लागते, तेव्हा ती कुणालाच सोडत नाही. त्यापासून वेळीच स्वतःला, देशाला वाचवूयात..."

जिथे प्रश्न विचारायला मुभा नसेल, ती जागा, तो देश, ते वातावरण निकोप कसे म्हणता येईल ?... अशा ठिकाणी केवळ 'पाप-पुण्याच्या' हिशेबात न अडकता लोक प्रबोधनाची आवश्यकता निर्माण होते. धर्माच्या आडून सत्ता राबवू पाहणाऱ्यांपासून आपण स्वतःला वाचवायला हवे.
- जावेद अख्तर