अकरावीच्या प्रवेशाची झाडाझडती

अकरावीच्या प्रवेशाची झाडाझडती

पुणे - अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कनिष्ठ महाविद्यालयांना अचानक भेटी देणार आहेत. यामध्ये विविध महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याकसह सर्वच कोट्यातील आणि नियमित फेऱ्यांमध्ये बेकायदा प्रवेश झाले आहेत, याची तपासणी केली जाणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ही मोहीम सुरू केली जाणार आहे.

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने या वर्षी अकरावीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली आहे. नियमित आणि त्यानंतर प्रथम येणारास प्रथम प्रवेश या तत्त्वावरील एकूण नऊ फेऱ्या झाल्या आहेत. आता त्यापुढील टप्पा हा तपासणीचा असेल. कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रक्रियेच्या फेरीतील गुणवत्ता यादीनुसार प्रवेश झाले आहेत की नाही, बेकायदा मार्गाने प्रवेश झाले आहेत का; तसेच विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित असते का, याची तपासणी केली जाणार आहे.

विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतात; परंतु खासगी क्‍लासबरोबर महाविद्यालयांचे संगनमत असल्याने विद्यार्थी वर्गात उपस्थित राहात नाहीत. या तपासणीतून असे प्रकारही पुढे येण्याची चिन्हे आहेत. सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘‘प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यात येते. यावर्षीदेखील नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तपासणी केली जाणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना कोणतीही कल्पना न देता अचानक भेटी देऊन ही तपासणी केली जाईल.’’

तपासणीसाठी पथके तयार केली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी झोन समित्या तयार होत्या. त्यांची मदत घेऊन संबंधित भागातील कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी होईल. यात प्रामुख्याने समितीने तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश झाले आहेत का, प्रवेश देताना गैरप्रकार झाले आहेत किंवा काय तसेच प्रवेश झालेले विद्यार्थी वर्गात उपस्थित राहातात का, याची तपासणी केली जाणार आहे. अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयात कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत, ते योग्य आहेत का, याची शहानिशा केली जाणार असून, त्यासाठी कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.

२१ हजार जागा रिक्त
शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रवेश प्रक्रियेची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील ९२ हजार ३५० एकूण प्रवेश क्षमतेपैकी ७१ हजार ५५ जागांवर प्रवेश झाले आहेत. अजूनही अकरावीच्या २१ हजार २९५ जागा रिक्त आहेत. दोन्ही महापालिका क्षेत्रांत शंभर टक्के प्रवेश झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या १६० आहे. यातील बहुतांश महाविद्यालये अनुदानित आहेत. २० विद्यार्थ्यांपेक्षा कमी प्रवेश झालेल्या महाविद्यालयांची संख्या ६८ आहे. ते सर्व विनाअनुदानित आहेत.

सूचना करण्याचे आवाहन
अकरावीची प्रक्रिया या वर्षी पूर्णत: ऑनलाइन झाली, तशीच पुढील वर्षीदेखील असेल; परंतु ही प्रक्रिया अधिकाधिक विद्यार्थिकेंद्रित आणि सोयीस्कर होण्यासाठी तसेच त्यात सुधारणा करण्यासाठी सूचना करण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी केले आहे. विद्यार्थी, पालकांसह शिक्षण क्षेत्रातील विविध घटक, शिक्षक, प्राचार्य, संस्था, समाजसेवी संस्था, शिक्षण तज्ज्ञ यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सूचना पाठाव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. 
 

वाणिज्य शाखेला प्राधान्य 
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बहुतांश वेळा विद्यार्थी विज्ञान शाखेला प्राध्यान्य देतात. या वर्षी मात्र विद्यार्थ्यांचा कल हा वाणिज्य शाखेकडे आहे. या शाखेला इंग्रजी, मराठी माध्यम मिळून एकूण २५ हजार ६४९ प्रवेश झाले. इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत ही संख्या साडेतीन हजारांनी अधिक आहे. भविष्यात रोजगार लवकर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी विचार करून ही शाखा निवडली असावी, असा तज्ज्ञांचा तर्क आहे.

‘कटऑफ’चा फुगा फुटला
कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावीचा आधीच्या वर्षीचा शेवटचा प्रवेश किती टक्‍क्‍यांना झाला म्हणजे त्या महाविद्यालयाचा कटऑफ किती यावरून त्या त्या महाविद्यालयाची किंमत आणि प्रतिष्ठा ठरते; परंतु या वर्षी ‘प्रथम येणारास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार फेऱ्या झाल्याने कटऑफचा फुगा फुटला आहे. या फेरीत ज्या महाविद्यालयात जागा रिक्त होती, तिथे दहावीला कितीही गुण पडलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश घेण्याचा हक्क देण्यात आला होता. अगदी ९० टक्‍क्‍यांपुढे ‘कटऑफ’ असलेल्या महाविद्यालयांमध्ये ५०-६० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याचे सांगितले जाते.

शाखा            माध्यम               जागा                    प्रवेश
कला                  इंग्रजी                ४७९०                 १५३६
कला                  मराठी                ७९८०                 ५६७१
वाणिज्य              इंग्रजी                २४०९५               १५९६८
वाणिज्य              मराठी                 १२८६०              ९६८१
विज्ञान                इंग्रजी                 ३७९२०              २२११७
एमसीव्हीसी          इंग्रजी                 १४८५
एमसीव्हीसी          हिंदी                  १५०
एमसीव्हीसी          मराठी                 ३०७०                 २४४४
एकूण                                          ९२३५०               ५७४१७

२७१ - कनिष्ठ महाविद्यालये
५७६ - शाखांची संख्या 
९२३५० - प्रवेश क्षमता
५७४१७ - केंद्रीय पद्धतीने प्रवेश
१३६३८ - कोटा पद्धतीने प्रवेश
२१२९५ - राहिलेल्या रिक्त जागा 
७१०५५ - झालेले एकूण प्रवेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com