कर्वे रस्त्यावर पुन्हा चक्राकार वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

कोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकात पुढील दहा महिन्यांसाठी पुन्हा एकदा चक्राकार वाहतूक योजना राबविणार आहे. मेट्रो, वाहतूक पोलिस, महापालिका अधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकात पुढील दहा महिन्यांसाठी पुन्हा एकदा चक्राकार वाहतूक योजना राबविणार आहे. मेट्रो, वाहतूक पोलिस, महापालिका अधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळ स्टॉप) चौकात वाहतुकीची मोठी कोंडी होते. यावर उपाययोजना म्हणून एसएनडीटी चौक ते अभिनव चौक या दरम्यान चक्राकार वाहतूक योजना राबविणार आहे. पुढील पंधरा दिवसांनंतर ती सुरू होणार आहे. कर्वे रस्त्यावर फ्लाय ओव्हर ते नळ स्टॉप या दरम्यान मेट्रो पिलरचे काम सुरू होत आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक वळविणार आहे. हा वाहतूक बदल कसा असेल, याची बुधवारी सकाळी पाहणी करून निर्णय घेण्यात आला.

या वेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे, ‘महामेट्रो’चे रितेश गर्ग, ‘एनसीसी’चे नामदेव गव्हाणे, महापालिका उपायुक्त श्रीनिवास बोनाला, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका हर्शाली माथवड, वासंती जाधव, संदीप खर्डेकर, संदीप मोकाटे आदी  उपस्थित होते.

यापूर्वी ही योजना दोन वेळा राबविली होती. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे ती बंद करावी लागली आहे. २००६ मध्ये आठ दिवस आणि २०१७ मध्ये एक दिवस महापालिका प्रशासनाने अभिनव चौकात चक्राकार वाहतुकीचा प्रयोग राबविला होता. मात्र, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी प्रचंड वाढल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा  लागला आणि ही योजना गुंडाळावी लागली होती.

मेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होते. येत्या पंधरा दिवसांत पदपथाची रुंदी कमी करणे, विजेचे खांब हटविणे, बॅरिकेडिंग करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे.
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती

अशी वळविणार वाहतूक... 
कोथरूडकडून येणारी वाहतूक एसएनडीटीशेजारील कॅनॉल रस्त्यावर वळविली जाणार आहे. त्यानंतर आठवले चौकातून नळ स्टॉप चौकाकडे जाईल. नळ स्टॉप ते पौड फाटा उड्डाण पुलापर्यंत एकेरी वाहतूक करणार असून, या रस्त्याचा नऊ मीटरचा भाग मेट्रो पिलर उभारणीसाठी वापरला जाणार आहे. मात्र, हा वाहतूक बदल अमलात आणण्यापूर्वी कर्वे रस्त्यावरील आवश्‍यक बदल तातडीने पूर्ण करावेत, अशी सूचना वाहतूक पोलिस सहायक आयुक्त प्रभाकर ढमाले व प्रतिभा जोशी यांनी केली. दरम्यान, यापूर्वी ठरल्याप्रमाणे संपूर्ण कर्वे रस्ता ‘नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन’ करण्याबाबतचे फलक अद्यापही लावलेले नाहीत; तसेच पदपथ कमी करणे, हलविलेल्या बस थांब्याचे माहिती फलक उभारले नसल्याबद्दल संदीप खर्डेकर व माधुरी सहस्रबुद्धे यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रयोग करा; पण हट्ट नको !
वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून चक्राकार वाहतूक योजनेचा प्रयोग करण्यास हरकत नाही. मात्र, नागरिकांना त्रास होता कामा नये. योजना असफल झाल्यास कोणाच्या हट्टासाठी सुरू ठेवू नये. तसेच कर्वे रस्त्यावरील पदपथाची रुंदी कमी केल्यास वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. याबाबत मेट्रो आणि महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करणार असल्याचे नगरसेवक जयंत भावे यांनी सांगितले.

Web Title: pune news karve road transport