रसिकांनी अनुभवला गीत आणि संगीताचा तिहेरी आविष्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पिंपरी : गाजलेल्या मराठी गीतांचे सादरीकरण, संगीतबद्ध केलेल्या नव्या काव्यरचनांचे गायन आणि काव्य वाचन असा तिहेरी संगीतमय आविष्कार रसिकांना नुकताच चिंचवड-तानाजीनगर येथे अनुभवता आला. निमित्त होते नवरात्रोत्सवातंर्गत आयोजित "हे रंग जीवनाचे' या कार्यक्रमाचे.

पिंपरी : गाजलेल्या मराठी गीतांचे सादरीकरण, संगीतबद्ध केलेल्या नव्या काव्यरचनांचे गायन आणि काव्य वाचन असा तिहेरी संगीतमय आविष्कार रसिकांना नुकताच चिंचवड-तानाजीनगर येथे अनुभवता आला. निमित्त होते नवरात्रोत्सवातंर्गत आयोजित "हे रंग जीवनाचे' या कार्यक्रमाचे.

सरदार गावडे प्रतिष्ठानतर्फे आयोजित आणि मैत्र ग्रुप प्रस्तुत या कार्यक्रमात जीवनातील विविधरंगी भावभावनांचे प्रतिबिंब उमटले. रसिकांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कवी दीपेश सुराणा यांची निर्मिती व संकल्पना होती. गायक नंदीन सरीन यांनी संगीत दिग्दर्शन केले. कवी अनिल दीक्षित, सुराणा यांनी विविध कविता सादर केल्या. तर, गायक सरीन आणि धनाजी कांबळे यांनी विविध गीते आणि संगीतबद्ध केलेल्या काव्यरचनांचे गायन केले.

गायक सरीन यांनी "हे नाम रे, सबसे बडा तेरा नाम..' हे गीत सादर करून कार्यक्रमाची सुरवात केली. त्यानंतर, त्यांनीच कार्यक्रमाचे शीर्षकगीत "हे रंग जीवनाचे' गायिले. कवी दीक्षित यांनी ही रचना लिहिली आहे. सरीन यांनी "या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..', "सूर तेच छेडिता..', आदी गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. "पुन्हा एकदा नव्याने' ही कवी सुराणा यांची काव्यरचना सरीन यांनी गायिली. "अशाच एखाद्या चांदण्या रात्री..', "प्रीत..', "फेसबुकच्या जगात..' अशा विविध कविता सुराणा यांनी सादर करून रसिकांना काव्यरंगात न्हाऊ घातले. दीक्षित यांनी "आई..', "बाप..' या प्रमुख रचनांसह "झिंगाट..', "झाल्या पोळ्या सांजा..' हे विडंबन सादर केले. त्याला रसिकांची मनमोकळी दाद मिळाली. कवी धनाजी यांनी "तू यावं, तू यावं..', "सांग कधी कळणार तुला..', "पणती जपून ठेवा..', "एका कुंकवापायी दूर..' आदी गीते आणि कविता गायिल्या. त्याला उत्स्फूर्त दाद मिळाली. नगरसेवक राजेंद्र गावडे, प्रकाशक नितीन हिरवे, कवी प्रदीप गांधलीकर, कैलास भैरट आदी उपस्थित होते. संतोष साळवे (तबला), महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे (गिटार) यांनी सुरेख साथसंगत केली.