खंबाटकी घाटात सहापदरी बोगदा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

गडकरींची घोषणा, पालखी मार्गाचेही सहा महिन्यांत विस्तारीकरण

गडकरींची घोषणा, पालखी मार्गाचेही सहा महिन्यांत विस्तारीकरण
पुणे - मुंबई - गोवा दरम्यान सिमेंटचा चौपदरी रस्ता आणि खंबाटकी घाटात सहापदरी नवा बोगदा उभारण्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केली. त्याचप्रमाणे पुणे - रायगडमार्गे दिघी बंदराचा प्रकल्प आराखडा तयार झाल्याचेही त्यांनी सांगितले; तर पालखी मार्ग विस्तारीकरणाचा प्रकल्प सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलाचे डिजिटल भूमिपूजन झाल्यावर ते बोलत होते. या प्रसंगी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या खेड सिन्नर विभागातील पाच बाह्यवळण मार्गाचा कोनशीला अनावरण समारंभ या वेळी झाला. तसेच खेड- सिन्नर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचा लोकार्पण सोहळा डिजिटल पद्धतीने झाला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार, अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक आदी यावेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, 'या पुढील काळात जलमार्ग वाहतुकीला प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी केंद्र सरकारने 20 हजार किलोमीटरच्या जलमार्गांना प्राधान्य दिले आहे. रेल्वे आणि मग रस्त्यावरील वाहतूक पाण्यावरील वाहतुकीला प्रती किलोमीटर 20 पैसे, रेल्वेला एक रुपया आणि रस्त्यावरील वाहतुकीला दीड रुपया खर्च येतो.'' पुणे मुळशीमार्गे दिघी बंदर योजनेचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्रिपदाची सूत्रे हातात घेण्यापूर्वी महाराष्ट्रात पाच हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते; आता त्यांची संख्या 22 हजार किलोमीटर झाली आहे. तसेच इंधनावरील अधिभारातील जमा होणाऱ्या रकमेपैकी या पूर्वी दरवर्षी 150 कोटी महाराष्ट्राला मिळायचे. आता सहा हजार कोटी रुपयांपर्यंत ही रक्कम वाढविली आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.
ते म्हणाले, ""मुंबई - गोवा मार्ग चौपदरी व सिमेंटचा करण्यात येत असून त्यासाठी 18 हजार कोटी खर्च होणार आहेत. कागल - कोल्हापूर रस्ता चांगला होत आहे. मात्र, पुणे- सातारा रस्त्याबाबत अनेक समस्या आहेत. पालकमंत्री बापट आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पुढाकार घेऊन अडचणी सोडविल्यास या रस्त्याचे काम सहा महिन्यांत मार्गी लावेल.''

खंबाटकी घाटात 6 लेनचा बोगदा बांधण्यासाठी 1 हजार कोटी रुपये खर्च करणार असून, पुणे- खोपोली - जेएनपीटी रेल्वेमार्ग झाल्यास कंटेनरची वाहतूक रेल्वेने होईल आणि रस्त्यावरील ताण कमी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यासाठी 15 कोटींचे पॅकेज
- पुणे जिल्हा आणि परिसरातील रस्त्यांसाठी 15 हजार 139 कोटींच्या पॅकेजमध्ये आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाचे मोशी ते मोहोळ आणि वासुंदे, बारामती ते फलटण दरम्यान विस्तारीकरण, पुणे-नाशिक महामार्गावर खेडपासून नाशिक फाट्यापर्यंत सहापदरी रस्ता, भोर शिरवळ लोणंद वाठार सातारा मार्गाचे विस्तारीकरण, तळेगाव जंक्‍शन- चाकण- शिक्रापूर- न्हावरा चौफुला चौक यांना जोडणाऱ्या महामार्गाचे विस्तारीकरण तसेच धार्मिक पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या सरळगाव भीमाशंकर वाडा-खेड आदी रस्त्यांच्या विस्तारीणकरणाचा समावेश आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील लोहमार्गावरील 13 उड्डाण पुलांना या वेळी मंजुरी देण्यात आली.