लक्ष्मीपूजनासाठी मुबलक ऊस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पुणे - लक्ष्मीपूजनाकरिता बाजारात 419 तसेच 261 व 86032 जातीचा ऊस मुबलक प्रमाणात आला आहे. शेतीला अनुकूल पाऊस झाल्याने उसाचे उत्पादनही चांगले झाले आहे. लक्ष्मीचे प्रतीक म्हणून पूजेत आवर्जून स्थान मिळविलेल्या उसामुळे घाऊक, किरकोळ व्यापाऱ्यांसहित उसाच्या मोळ्या बांधणाऱ्या कामगारांना समाधानकारक रोजगार मिळत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. 

आश्‍विन वद्य अमावास्येला लक्ष्मीपूजनात उसाला विशेष स्थान असते. त्यामुळे दरवर्षी हमखास उसाची मोठ्या प्रमाणात आवक होते. पुणे शहरात लक्ष्मीपूजनाकरिता घरोघरी नागरिक ऊस घेऊन जातात. पुणे शहरासाठी खडकी-नसरापूर, फुरसुंगी, तळेगाव ढमढेरे, पिंपरी सांडस, खेड शिवापूर येथून ऊस येतो. दिवाळीनिमित्त शेतकरीही उसाच्या मोळ्या घेऊन विक्रीस येतात. गुरुवारी (ता. 19) लक्ष्मीपूजन आहे. या निमित्ताने महात्मा फुले मंडईतही उसाची आवक वाढली आहे. 

विक्रेते विनायक थिटे म्हणाले, ""दिवाळीत उसाचे उत्पादन नेहमीपेक्षा चौपट रोजगार मिळवून देते. दिवसाला साधारणतः आठशे रुपये मिळतात. धार्मिक महत्त्व असल्याने उसाची खरेदी-विक्री टनांमध्ये होते.'' 

विक्रेते अप्पा कुलकर्णी म्हणाले, ""एक मोळी वीस ते दीडशे रुपयांपर्यंत असते. अर्थात उसाच्या जातीवरून मोळीची किंमत ठरते. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनाही रोजगार मिळतो.''