शिकाऊ परवाना विभाग होणार 'स्मार्ट'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

पाच कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर होणार

पाच कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर होणार
पुणे - पावसाळ्यात साठणारे पाणी, त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय, या पार्श्‍वभूमीवर शिकाऊ परवाना (लर्निंग लायसेन्स) विभाग दुसऱ्या मजल्यावर हलविण्याचा विचार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) सुरू आहे. त्यासाठी पाच कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून येत्या आठ दिवसांत हा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या असलेल्या शिकाऊ परवाना विभागाला नवे रूप मिळणार आहे. तेथे येणाऱ्या नागरिकांनाही चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

शिकाऊ परवाना काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात दररोज सुमारे 300 नागरिक येत असतात. मात्र, विभागासाठी असलेली जागा अपुरी पडत असल्याने नागरिकांना योग्य सुविधाही देता येत नाही. अनेकदा या विभागात उभे राहण्यासाठी देखील जागा नसते. तसेच नागरिकांना स्वच्छतागृहाची सुविधाही उपलब्ध करून देता येत नाही.

दोन दिवसांपूर्वीच झालेल्या पावसाने या विभागाची अक्षरशः दाणादाण उडाली होती. विभागात पावसाचे पाणी शिरल्याने शिकाऊ परवाना काढण्याचे काम बंद करावे लागले होते. त्यामुळे हा विभाग आरटीओ कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करून तेथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरटीओ कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर कॉर्पोरेट लर्निंग लायसेन्स विभाग उभारण्यात येणार असून त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून तसा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.
- बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी