‘बांधकामांबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

पुणे - लोहगाव विमानतळ परिसरातील वाघोलीच्या बाजूला असलेल्या बाँब ड्रमपासून ९०० मीटर, तर पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर दिशेला हवाई दलाच्या दिशेला असलेल्या १०० मीटरच्या परिसरात असलेल्या बांधकामांबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या बांधकामांचे भवितव्य आता जिल्हाधिकारी यांच्या हातात आले आहे.

हवाई दलाच्या परिसरात बांधकामांना मनाई करण्याचा आदेश १४ फेब्रुवारी २०१४ रोजी हवाई दलाने काढले होते. त्यामुळे वडगाव शेरी, खराडी, लोहगाव आणि धानोरी परिसरात सुरू असलेली बांधकामे अडचणीत आली होती. 
दरम्यान, या प्रकरणात काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या संदर्भात जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती मागितली. पुन्हा सर्व प्रक्रिया तीन महिन्यांच्या आत राबवावी आणि बांधकामांसंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्यांचे सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील महिन्यात जिल्हा प्रशासन याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यानंतर या बांधकामांबाबतचा अहवाल न्यायालयास सादर करणार आहे.