मराठा क्रांती मोर्चा रद्द 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पुणे - हवामान विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केल्यामुळे सोमवारी (ता. 25) होणारा मराठा क्रांती मोर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक व संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे - हवामान विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केल्यामुळे सोमवारी (ता. 25) होणारा मराठा क्रांती मोर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक व संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

शिंदे म्हणाले, ""डॉ. खोले यांनी काही दिवसांपूर्वी सोवळे मोडल्याच्या कारणावरून केटरिंग व्यवसाय करणाऱ्या निर्मला यादव यांना जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केली होती. खोले यांनी उच्च-नीचतेच्या नावाखाली "आम्हा ब्राह्मणाचे देव तुमच्या हातच्या स्वयंपाकामुळे (नैवेद्य) बाटले,' अशा प्रकारचे वक्तव्य करून यादव यांच्याविरोधात खोटी पोलिस तक्रारही केली होती. त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण झाली होती. या पार्श्‍वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने खोले यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी 25 सप्टेंबर रोजी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयावर निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन पोलिस अधिकाऱ्यांनी खोले यांच्यावरील अदखलपात्र गुन्ह्याचे रूपांतर दखलपात्र गुन्ह्यात केले आहे. तसेच सीआरपीसीतील 155 (2) नुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गुळवे-पाटील यांच्याकडून परवानगी घेऊन खोले यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व तपास सुरू केला आहे. त्यामुळे निषेध मोर्चा रद्द करण्यात आला आहे.'' या वेळी मोर्चा समन्वयक शांताराम कुंजीर, तुषार काकडे, ऍड. कमल सावंत, छावा संघटनेच्या छाया खैरनार आदी उपस्थित होते. 

मराठी अस्मिता परिषद बुधवारी 
सकल मराठा-बहुजन समाजातर्फे बुधवारी (ता. 27) सकाळी 11.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे मराठी अस्मिता परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे उद्‌घाटन निर्मला यादव यांच्या हस्ते होणार आहे. शरद गोरे दिग्दर्शित "धर्माची दारू व जातीची नशा' या समाजप्रबोधनपर नाटकाने या परिषदेची सुरवात होणार आहे. परिषदेत शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होणार आहे. परिषदेत पुरोगामी, परिवर्तनवादी व समविचारी संघटना सहभागी होणार आहेत, असे संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले.

Web Title: pune news maratha kranti morcha dr. medha khole