वजनदार कादंबऱ्या होणार ‘स्लीम’

रविवार, 28 मे 2017

श्री. ना. पेंडसे, शंकर पाटील, गोनींदा, ह. ना. आपटे अशा अनेक मान्यवरांच्या कादंबऱ्या आम्ही संक्षिप्त स्वरूपात आणणार आहोत. त्या वाचून मूळ कादंबऱ्यांची उत्सुकता आणि एकूणच वाचनाची गोडी वाढावी, हा आमचा मूळ हेतू आहे. हे काम आव्हानात्मक असेच आहे. यासाठी जाणकार लेखकांची मदत घेतली जाणार आहे. 
- डॉ. मंदा खांडगे, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ

पुणे : मराठी साहित्याचा वाचकवर्ग वाढावा म्हणून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रकाशित झालेल्या जाडजूड आणि वजनदार कादंबऱ्या लघुरूपात वाचकांसमोर आणण्याचे शिवधनुष्य पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने उचलले आहे. त्यामुळे पाचशे-सहाशे पानांची कादंबरी अवघ्या ७०-८० पानांत वाचायला मिळणार आहे. मराठी साहित्यात होत असलेल्या या नव्या प्रयोगाकडे सध्या अनेकांचे लक्ष लागले आहे.

‘मृत्युंजय’, ‘ययाति’, ‘स्वामी’, ‘अमृतवेल’, ‘बनगरवाडी’, ‘दुनियादारी’ अशा कितीतरी कादंबऱ्यांनी महाराष्ट्रातील वाचकांना वेड लावले. कुमार वयोगटातील मुले तर त्यावर तुटून पडायची; पण हल्लीची नवी पिढी मराठी पुस्तकात फारशी रमत नाही. हे चित्र बदलावे आणि पुन्हा एकदा कुमार वयोगटातील मुले कादंबऱ्यांकडे वळावीत म्हणून ‘साहित्यप्रेमी’च्या संशोधन मंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

‘साहित्यप्रेमी’च्या विश्‍वस्त डॉ. मंदा खांडगे म्हणाल्या, ‘‘कुमार वयोगटाला समोर ठेवून लेखन करणे सध्या खूप कमी झाले आहे. त्यात ही मुले ‘सोशल मीडिया’च्या चक्रात अडकली आहेत. त्यामुळे त्यांचे अवांतर वाचनही कमी झाले आहे. या गोष्टींचा विचार करून आपण आहे त्या स्थितीत काय करू शकतो, याचा विचार करताना जुन्या कादंबऱ्या संक्षिप्त स्वरूपात मुलांसमोर आणण्याचा विचार पुढे आला. संबंधित लेखक, लेखक हयात नसतील, तर त्यांचे कुटुंबीय आणि प्रकाशक यांची परवानगी घेऊन शंभरहून अधिक कादंबऱ्यांची यादी आम्ही तयार केली आहे. या कादंबऱ्या संक्षिप्त स्वरूपात करताना मूळ गाभ्याला कोठेही धक्का लागणार नाही हे पाहू. त्यासाठी तज्ज्ञांचे संपादक मंडळही नेमणार आहोत.’’