नालेसफाईच्या कामाला वेग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

ओढे, नाले दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तसेच लोकवस्त्यांमधील नाल्यांतील गाळ काढण्याची कामे करण्यात येत आहेत. पावसाळी गटारे साफ केली जात असून, त्यासाठी आवश्‍यक तेवढे कामगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये ही कामे पूर्ण होतील.
- विजय दहिभाते, उपायुक्त, महापालिका

पुणे : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर लोकवस्त्यांमधून वाहणारे ओढे, नाल्यांची साफसफाई करण्यास महापालिकेने सुरवात केली आहे. पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्‍यता असल्याने नाल्यांमधील गाळ आणि कचरा प्राधान्याने काढण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, नाल्यांच्या साफसफाईची कामे सुटीच्या दिवशी म्हणजे रविवारीही करण्यात येणार आहेत. तसेच पुढील चार ते पाच दिवसांत ओढे आणि नाल्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने शनिवारी जाहीर केले.

शहर आणि उपनगरांमधून सुमारे साडेतीनशे किलोमीटर लांबीची नाले आणि पाचशे किलोमीटर लांबीची पावसाळी गटारे आहेत. पावसाला सुरवात झाली, तरी नाल्यांची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळ्याआधी हे कामे करण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार, संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र ही कामे वेगाने होत नसल्याने ऐन पावसाळ्यात धोकादायक स्थितीत निर्माण होण्याची भीती आहे. याकडे 'सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर ओढे, नाल्यांच्या कामांना सुरवात झाली आहे.

वडगावशेरी, धानोरी, कळस, खराडी, चंदननगर परिसरासह विविध भागांतील कामे शनिवारी वेगाने सुरू होती. तसेच कात्रज परिसरातील कामांनाही सुरवात झाली आहे. अंबिल ओढा आणि नाल्यामधील कचरा, गाळ काढण्याबाबत नगरसेवक धीरज घाटे यांनी प्रशासनाला पत्र दिले आहे. रहिवाशांच्या सोयीसाठी नाल्याभोवती लोखंडी जाळ्या बसविण्याचे कामही तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.