‘वॉटर एटीएम’च्या उद्‌घाटनासाठी हवे मंत्री

‘वॉटर एटीएम’च्या उद्‌घाटनासाठी हवे मंत्री

पुणे - लोकप्रतिनिधी किंवा एखाद्या मंत्र्याच्या हस्तेच ‘वॉटर एटीएम’चे उद्‌घाटन व्हावे, या बोर्ड सदस्यांच्या अशा हट्टामुळे तीन महिन्यांपासून पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाने बसविलेल्या ‘वॉटर एटीएम’चे उद्‌घाटन रखडले आहे. परिणामी, लाखो रुपये खर्चूनही या सुविधेचा लाभ नागरिकांना घेता येत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.

कॅंटोन्मेंटमध्ये येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, या हेतूने प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी ‘वॉटर एटीएम’ची संकल्पना मांडली. अनेक अडचणीनंतर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली. त्यानुसार कॅंटोन्मेंटच्या सातही वॉर्डामध्ये ‘वॉटर एटीएम’ बसविले. मोदीखान्यातील के. बी. हिदायतुल्ला रस्ता, आर. एस. केदारी रस्त्यावरील हिंद तरुण मंडळ, वानवडी बाझार, श्रीकृष्ण मंडळ येथील ‘वॉटर एटीएम’चा फायदा नागरिकांना होत आहे. घोरपडी, जे. जे. गार्डन व सोलापूर बझार येथे तीन महिन्यांपूर्वी ‘वॉटर एटीएम’ बसविले. मात्र त्याच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त अद्यापही मिळत नसल्याची सद्यःस्थिती आहे. 

आपल्या वॉर्डात बसविलेल्या ‘वॉटर एटीएम’चे उद्‌घाटन आमदार, खासदार किंवा मंत्र्यांच्या हस्ते व्हावी, अशी बोर्डाच्या सदस्यांची इच्छा असते. त्या दृष्टीने त्यांच्याकडून प्रयत्नही केले जात आहेत. मात्र ‘वॉटर एटीएम’ बसवून तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. तरीही लोकप्रतिनिधी उपलब्ध होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सव्वातीन लाख रुपये किमतीचे एक-एक यंत्र आहे. ते बसवून कित्येक दिवस झाले आहेत. याविषयी प्रशासनही आता त्रस्त झाले आहे. सदस्या रूपाली बिडकर म्हणाल्या, ‘‘वॉटर एटीएम सुरू करण्यास आमची हरकत नाही. त्या दृष्टीने आम्ही प्रशासनाला कळविले आहे. मात्र स्थानिक रहिवाशांना भेडसावणारा पाणी प्रश्‍न सोडविणेही गरजेचे आहे.’’

कॅंटोन्मेंटने सात ‘वॉटर एटीएम’ बसविली आहेत. त्यापैकी फक्त तीन यंत्रांचे उद्‌घाटन होणे बाकी आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर झाल्या की लगेचच उद्‌घाटन करण्यात येईल.
- अतुल गायकवाड, उपाध्यक्ष, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com