शहर, उपनगरांत विजेचा लंपडांव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

पुणे - पावसाळ्यापूर्वी विजेची कामे झाल्याचा महावितरणचा दावा दरवर्षीप्रमाणे यंदाही फोल ठरला. सोमवारी झालेल्या पावसामुळे बोपोडी, औंध, खडकीसह सिंहगड रस्ता, माणिकबाग परिसर आणि मध्यवर्ती पेठांमध्येही विजेचा लपंडाव अनुभवायला मिळाला. काही ठिकाणी तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. 

पुणे - पावसाळ्यापूर्वी विजेची कामे झाल्याचा महावितरणचा दावा दरवर्षीप्रमाणे यंदाही फोल ठरला. सोमवारी झालेल्या पावसामुळे बोपोडी, औंध, खडकीसह सिंहगड रस्ता, माणिकबाग परिसर आणि मध्यवर्ती पेठांमध्येही विजेचा लपंडाव अनुभवायला मिळाला. काही ठिकाणी तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. 

दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंता व जनमित्रांनी सतर्क व तत्पर राहावे, दुरुस्तीसंबंधीचा आढावा घ्यावा, आवश्‍यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून त्वरित वीजपुरवठा सुरू करावा, पावसामुळे वीजयंत्रणेत होणारे संभाव्य बिघाड टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, गंभीर बिघाड असल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सक्रिय राहावे, असे आदेश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी दिले. कामामध्ये दिरंगाई केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले. 

माणिकबाग येथील रहिवासी आशुतोष डांगे म्हणाले, ""दुपारी चार वाजल्यापासून वीज गेली आहे. रात्री साडेआठ वाजून गेले तरी आलेली नाही. त्यामुळे अंधारात बसावे लागले. महावितरणला कळवूनही प्रतिसाद मिळत नाही.'' 

महावितरणचे आज, उद्या अभियान 
नवीन वीजजोडणी, नाव, पत्त्यातील बदल, वीजबिलातील दुरुस्ती, मीटर बदलण्यासह अन्य तक्रारी सोडविण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. बुधवारी (ता. 19) पेशवे पार्क, मार्केट यार्ड, धनकवडी, रास्ता पेठ, विश्रांतवाडी, अग्निशामक केंद्र, वाडिया येथील उपविभाग कार्यालयांत; तर गुरुवारी (ता.20) स्वारगेट, कसबा पेठ उपविभाग कार्यालयांत सकाळी अकरा वाजता अभियान आयोजित केले असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स