तालयात्रेत कलेची गुंफण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

पुणे - अत्तराचा दरवळणारा गंध...आकाशकंदिलाचा झगमगाट...पणत्यांची आकर्षक आरास...बोचऱ्या थंडीला कोवळ्या उन्हाची साथ...अशा आनंददायी वातावरणात गायन, वादन, नृत्य या तीनही कलांची गुंफण अनुभवायला मिळाली, तर तो क्षण अविस्मरणीयच ठरेल. असाच अविस्मरणीय आनंदसोहळा "सकाळ'च्या "दिवाळी पहाट'मध्ये पुणेकरांनी बुधवारी अनुभवला. 

पुणे - अत्तराचा दरवळणारा गंध...आकाशकंदिलाचा झगमगाट...पणत्यांची आकर्षक आरास...बोचऱ्या थंडीला कोवळ्या उन्हाची साथ...अशा आनंददायी वातावरणात गायन, वादन, नृत्य या तीनही कलांची गुंफण अनुभवायला मिळाली, तर तो क्षण अविस्मरणीयच ठरेल. असाच अविस्मरणीय आनंदसोहळा "सकाळ'च्या "दिवाळी पहाट'मध्ये पुणेकरांनी बुधवारी अनुभवला. 

नरक चतुर्दशीचे निमित्त साधून तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या तालविषयक चिंतनातून निर्माण झालेली "तालयात्रा' ही मैफल "सकाळ'तर्फे आयोजिण्यात आली होती. या "दिवाळी पहाट'चे पु. ना. गाडगीळ (1832) हे मुख्य प्रायोजक, तर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि देवधर ऍकॅडमी ऑफ एक्‍सलन्स हे सहप्रायोजक होते. 

गायन, वादन, नृत्य या शाखा वेगवेगळ्या असल्या तरी संगीत हे एकच आहे, हे सूत्र घेऊन तयार झालेल्या "तालयात्रे'त विविध राग, ताल, वेगवेगळ्या पारंपरिक वाद्यांबरोबरच पाश्‍चिमात्य वाद्यांचा वापर, वादनासह गायन-नृत्यातील सूक्ष्मता सांभाळण्याची आणि एकाग्रता टिकवण्याची हातोटी...अशी एकत्र गुंफण थक्क करणारी ठरली. पं. सुरेश तळवलकर यांच्याबरोबरच नव्या पिढीतील 25 हून अधिक कलाकार यात सहभागी झाले होते. कलेबरोबरच पंडितजींची ऊर्जा आणि नव्या पिढीतील कलाकारांच्या ऊर्जेची गुंफणही अनुभवायला मिळत होती. 

"मृदंग संकीर्तन'ने मैफलीची सुरवात झाली. राग चारुकेशी आणि ताल धमारमधील "सुमीरण कर' या रचनेतून त्यांनी श्रोत्यांना तालात गुंतवले. राग तोडी आणि झपतालमधील "श्‍याम छबी', राग सोहोनी आणि आडातालातील मोगूबाई कुर्डीकर यांची "चलो हट पिया' अशा वेगवेगळ्या बंदिशींना श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. तबला आणि पाश्‍चिमात्य वाद्यांची जुगलबंदीही तितकीच रंगली. "डमरू बाजे' या बंदिशीबरोबरच राग काफीमधील "आज मन बस गई' ही जुनी बंदिशीही ऐकण्याचा योग मिळाला. 

या वेळी "पु. ना. गाडगीळ'चे अभय गाडगीळ, दीपा गाडगीळ, "देवधर ऍकॅडमी'चे प्रा. संदीप देवधर, "लोकमान्य मल्टिपर्पज'चे विभागीय प्रमुख सुशील जाधव यांचा "सकाळ'चे वृत्त संपादक माधव गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गाडगीळ म्हणाले, ""गायकाच्या गळ्यातून येणाऱ्या सुराइतकीच वाद्य आणि नृत्यही आपल्याला गुंतवून ठेवू शकतात, याचा प्रत्यय "तालयात्रा' पाहताना आला.''

दीपा गाडगीळ म्हणाल्या, ""कुठल्याही नव्या उपक्रमात पु. ना. गाडगीळ नेहमीच सहभागी असते. "सकाळ'तर्फे आयोजित "तालयात्रा' हे याचे बोलके उदाहरण आहे.'' राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.