'निसर्गाकडे सकारात्मकतेने पाहायला हवे'

मीनाक्षी गुरव
शुक्रवार, 28 जुलै 2017

पुणे - निसर्ग दरवेळी आल्हाददायक "सरप्राइज'चं भांडार तुमच्यासमोर उलगडत असतो, फक्त त्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची वृत्ती आत्मसात  करायला हवी, असे सांगत वन्यजीव छायाचित्रकार क्‍लेमेंट फ्रान्सिस यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. फ्रान्सिस येत्या शनिवारी पुण्यात येत आहेत. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद. 

पुणे - निसर्ग दरवेळी आल्हाददायक "सरप्राइज'चं भांडार तुमच्यासमोर उलगडत असतो, फक्त त्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची वृत्ती आत्मसात  करायला हवी, असे सांगत वन्यजीव छायाचित्रकार क्‍लेमेंट फ्रान्सिस यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. फ्रान्सिस येत्या शनिवारी पुण्यात येत आहेत. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद. 

निसर्गावरील प्रेम हेच छायाचित्रणाकडे वळण्यास कारण ठरल्याचे सांगत फ्रान्सिस म्हणाले, ""पंचवीस वर्षांपूर्वी मी छायाचित्रणाला सुरवात केली, त्या वेळी हातावर मोजण्याइतकेच लोक वन्यजीव छायाचित्रण करत होते. डिजिटल तंत्रज्ञानामुळे चांगली उपकरणे असणाराही फोटोग्राफर बनू शकतो; परंतु एका चांगल्या "क्‍लिक'साठी वेळ आणि उत्साह आवश्‍यक आहे. उदाहरणार्थ, पक्ष्याचा चांगला फोटो घेण्यासाठी त्यांच्या अधिवासात सातत्याने जावे लागते. नॅशनल जिओग्रॉफिक सोसायटीच्या मासिकातील छायाचित्रांनी शालेय जीवनातच माझे लक्ष वेधले होते आणि त्या दर्जाचे फोटो काढता यावेत, असे वाटू लागले. 

फ्रान्सिस म्हणाले... 
निसर्गातील बदल टिपण्याचा अनुभव औरच  छायाचित्रणासाठीच्या जागेतील हवामान आणि परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे असते. निसर्गात कधी काय बदल होतील, हे सांगता येत नाही. त्याकडे सकारात्मकतेने पाहिल्यास चांगला फोटो मिळतोच. निसर्गातील हे बदल पाहणे आणि कॅमेऱ्यात कैद करण्याचा अनुभव काही औरच असतो. 

...अन्‌ तेवढ्यात बिबट्या आला 
एप्रिल 2017 मध्ये उत्तराखंडमधील कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पात गेलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. माळरानावर हत्तींचे फोटो घेण्यासाठी कॅमेरा काढला 
अन्‌ तेवढ्यात बिबट्या समोर आला. मी तितकासा आश्‍चर्यचकित झालो नाही; परंतु माझ्यासोबतचे गाइड आणि चालकाने वीस वर्षांत आम्हाला पहिल्यांदा येथे बिबट्या दिसल्याचे सांगितले. त्या वेळी "अमेझिंग क्षणाचा' साक्षीदार झाल्याचा आनंद आहे. अमूर ससाण्याने शिकारीचा घेतलेला अचूक वेध, तसेच केनियातील मार्शल ईगलच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपता येणे मला भावले. एकदा जंगलात आम्ही जीपकडे चाललो असताना अचानक दोन फुटांवर आलेला बिबट्या पाहून आम्ही थबकलोच..!! 

कौशल्यं निसर्गतःच विकसित होतात 
कौशल्यं तुमच्यात निसर्गतःच असतात. त्याला ज्ञान आणि अनुभवाची जोड आवश्‍यक असते. तुमचा क्‍लिक करण्याचा वेग योग्य ठेवणे महत्त्वाचे असते. 
निसर्गतःच असे अनेक प्रसंग समोर येतात; परंतु चांगल्या फोटोसाठी त्या अधिवासात पुरेसा वेळ घालवावा लागतो. निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गतःच कौशल्यं विकसित होत जातात. 

निधीचा अभाव 
डिजिटल तंत्रज्ञानामुळे छायाचित्रणात रंगसंगती, संकलन शक्‍य झाले. या क्षेत्रासाठी अपुरे अर्थसाहाय्य, उपकरणांचा अभाव आणि अवाजवी प्रवासखर्च, या अडचणींचा सामना करावा लागतो; परंतु मिळणारे समाधान मोलाचे असते. 

सादरीकरण शनिवारी 
जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून नेचरवॉक चॅरिटेबल ट्रस्ट आणि जीविधा या संस्थांतर्फे येत्या शनिवारी (ता. 29) "महाराष्ट्रातील सस्तन प्राणी' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या वेळी क्‍लेमेंट फ्रान्सिस यांचे सादरीकरण होणार आहे. 
- स्थळ : गोखले इन्स्टिट्यूट, बीएससीसी रस्ता 
- वेळ : सायं. 6.15 वा.