नाट्य संमेलन जळगाव की नाशिकमध्ये? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

पुणे - नाट्य क्षेत्रातील महत्त्वाचा सोहळा असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी यंदा जळगाव आणि नाशिक या दोनच ठिकाणांहून निमंत्रणे आली आहेत. या दोनपैकी एका स्थळावर पुढील महिन्यात होणाऱ्या नाट्य परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. 

पुणे - नाट्य क्षेत्रातील महत्त्वाचा सोहळा असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी यंदा जळगाव आणि नाशिक या दोनच ठिकाणांहून निमंत्रणे आली आहेत. या दोनपैकी एका स्थळावर पुढील महिन्यात होणाऱ्या नाट्य परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. 

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ नुकतेच जाहीर झाले आहे. त्यामुळे नाट्य संमेलन कोठे होणार? याबाबत नाट्यवर्तुळात उत्सुकता वाढली आहे. नाट्य संमेलनासाठी यंदा जळगाव आणि नाशिक येथील शाखांची दोनच निमंत्रणे आली आहेत. मात्र मागील वर्षी आलेल्या कोल्हापूर, नागपूर, महाबळेश्वर, जळगाव (मुक्ताईनगर) या निमंत्रणाचा विचार यंदाच्या संमेलनासाठी होणार आहे की नाही, हे परिषदेने अद्याप अधिकृतपणे जाहीर केले नाही. 

साहित्य संमेलनाप्रमाणेच नाट्य संमेलनाचीही स्थळ निवड समिती स्थळांची पाहणी करून परिषदेला अहवाल देते. त्यानंतर संमेलन स्थळाची घोषणा केली जाते. या नियमानुसार यंदाच्याही स्थळांची पाहणी होणार आहे. दरम्यान, परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, ""नाट्य संमेलनाचे स्थळ ठरवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही; पण एक-दीड महिन्यात ही प्रकिया पूर्ण होईल आणि त्यानंतर संमेलनाचे स्थळ जाहीर होईल.'' 

नाट्यसंमेलनाध्यक्ष कोण होणार? 
98व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी रंगकर्मींची नावे पाठवा, असे पत्र नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी राज्यातील सर्व नाट्य शाखांना सोमवारी (ता. 11) पाठवले आहे. ही नावे 28 सप्टेंबरपर्यंत पाठवावीत, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे प्रत्येक शाखेतून कोणकोणती नावे समोर येतात, याबाबतही नाट्य वर्तुळात उत्सुकता आहे. नाटककार सतीश आळेकर, गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार, नाटककार श्रीनिवास भणगे यांच्या नावाचा विचार पुण्यातील शाखा करत आहे, अशी माहिती परिषदेतील सूत्रांनी "सकाळ'ला दिली. 

Web Title: pune news natya sammelan