संमेलनाध्यक्षपदाची माळ पुणेकराच्या गळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पुणे - आगामी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी गायिका- अभिनेत्री कीर्ती शिलेदार, नाटककार श्रीनिवास भणगे आणि सुरेश साखवळकर यांची नावे सुचविण्यात आली असल्याने अध्यक्षपदाची माळ पुणेकराच्याच गळ्यात पडणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. मात्र, तिघांपैकी शिलेदार यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. त्या संमेलनाध्यक्ष झाल्या तर "एकाच घरात दोन अध्यक्ष' असे उदाहरण प्रथमच पाहायला मिळणार आहे.

नाट्य संमेलनाध्यक्षपदासाठी नावे सुचवा, असे पत्र परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने आपल्या सर्व शाखांना पाठवले होते. त्यानुसार पुणे, बारामती, शेवगाव या शाखांनी शिलेदार यांचे नाव सुचवले. पुण्यातील शाखेने शिलेदार यांच्याबरोबरच भणगे यांचेही नाव सुचवले. सातारा आणि तळेगाव दाभाडे येथील शाखांनी साखवळकर यांचे नाव परिषदेकडे पाठवले. नावे पाठवण्याची मुदत संपल्याने परिषदेने आलेली तीनही नावे जाहीर केली. विशेष म्हणजे, ही तीनही नावे पुण्यातील आहेत. त्यामुळे नाट्य संमेलनाध्यक्ष पुणेकरच होणार, हे नक्की झाले आहे.

शिलेदार म्हणाल्या, 'विचारांचे आदान- प्रदान होण्यासाठी नाट्य संमेलनाचे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. कुसुमाग्रज, भक्ती बर्वे अशा अनेक मान्यवरांची भाषणे मी संमेलनात ऐकली आहेत. या व्यासपीठाला एक महत्त्व आहे.''

भणगे म्हणाले, 'रसिक, नाटकाशी संबंधित कलावंत आणि सरकारचे प्रतिनिधी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने एकत्र येतात. असे चित्र अन्य कोठेही नसते. त्यामुळे अशा व्यासपीठावर रंगभूमीविषयक चिंतन मांडणे महत्त्वाचे असते. त्यासाठी मी उत्सुक आहे; पण निवड झाली नाही तर वेगवेगळ्या निमित्ताने मी माझे विचार मांडतच राहणार आहे.''

महाराष्ट्र हा नाट्यवेडा आहे, ही आपली ओळख काळाच्या ओघात पुसली जाऊ नये, असे वाटते. त्यासाठी काय करता येईल, कशी जागृती आणता येईल... याबाबतचे विचार आपल्याला संमेलनाच्या निमित्ताने अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवता येतात.
- कीर्ती शिलेदार, गायिका- अभिनेत्री

पुण्यातील नाट्य परिषदेने माझ्यासह कीर्ती शिलेदार अशी दोन नावे सुचवली. हे मला समजल्यानंतर मी एकच नाव सुचवा आणि तेही शिलेदार यांचे, असे सांगितले होते. शिलेदार यांचे योगदान मोठे आहे.
- श्रीनिवास भणगे, नाटककार

Web Title: pune news natya sammelan chairman selection