आता लेखकांकडे निधीची मागणी

आता लेखकांकडे निधीची मागणी

पुणे - साहित्य संमेलनासाठी निमंत्रित लेखकांनी प्रवास खर्च आणि मानधनाची अपेक्षा ठेवू नये. स्वत:चा खर्च स्वत:च करावा, असे जाहीर केल्यानंतर आयोजक संस्थेने आता संमेलन निधीत सर्वसामान्य वाचकांबरोबरच लेखकांनीही योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे लेखक आता काय भूमिका घेतात आणि स्वत:च्या खिशात ते हात घालतात का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

साहित्य संमेलन सर्वांचे असावे, असे दरवर्षी म्हटले जाते; पण यात लेखक आर्थिक योगदान देत नाहीत. उलट स्वत:चा प्रवास खर्च आणि मानधन मागतात. केवळ सरकार आणि आयोजकांनी उभारलेल्या निधीतून संमेलन साजरे केले जाते. या ‘परंपरां’ना बदलण्याचा प्रयत्न यंदाच्या संमेलनात आयोजकांच्या माध्यमातून सुरू झाला आहे. याचा पहिला प्रयत्न म्हणून ‘प्रवास खर्च आणि मानधनाची अपेक्षा ठेवू नका’, असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता लेखकांकडे निधीची मागणी केली आहे. यासाठी कोणकोणते लेखक पुढे येतात, याबाबत उत्सुकता आहे.

बडोद्यातील मराठी वाङ्‌मय परिषद या संमेलनाच्या निमंत्रक संस्थेचे अध्यक्ष दिलीप खोपकर म्हणाले, ‘‘संमेलनासाठी महाराष्ट्र सरकारने २५ लाखांचा निधी दिला आहे; पण आजच्या काळात कितीही साधे संमेलन करायचे म्हटले तरी एक ते दीड कोटी रुपयांपर्यंत खर्च येतोच. त्यामुळे उर्वरित निधी जमा करण्याचे आणि मिळालेल्या निधीचा काटकसरीने वापर करायचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरात सरकारही काही निधी संमेलनाला देईल, अशी अपेक्षा आहे; पण उर्वरित निधी लोकसहभागातून जमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाचकांनी स्वत:हून शंभर रुपये दिले तर त्यातूनही मोठी मदत उभी राहू शकेल. लेखकांनीही मदतीचे हात पुढे करावेत. सर्वांच्या सहभागातून माय मराठीचा हा सोहळा आपण साजरा करू.’’

पंतप्रधानांना निमंत्रण आणि विरोधही
बडोद्यात साहित्य संमेलन होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संमेलनाचे निमंत्रण देणार आहे. तसेच गुजरातचे नवे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही संमेलनासाठी बोलावले जाणार आहे, अशी माहिती खोपकर यांनी दिली. मात्र पंतप्रधानांच्या नावाला महामंडळातील काही पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. पंतप्रधानांसारखी व्यक्ती आल्यानंतर ‘प्रोटोकॉल’नुसार वागावे लागते. संमेलनाध्यक्षांचे भाषण बाजूला पडते. शिवाय असहिष्णुता, विचारवंतांच्या हत्या असे वादाचे विषयही चर्चेला येऊ शकतात. हेही काही पदाधिकाऱ्यांनी आयोजकांच्या निदर्शनास आणून दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com