सेंद्रिय गुळाची गोडी वाढली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मागणीत पंधरा टक्‍क्‍यांनी भर; दररोज सुमारे दीड हजार बॉक्‍सची आवक
पुणे - रसायनविरहित गुळाची मागणी वाढत असून, दरवर्षी या मागणीत दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी भर पडत आहे. त्यामुळे त्याचे नवनवीन ‘ब्रॅंड’देखील बाजारात येऊ लागले आहेत.

मागणीत पंधरा टक्‍क्‍यांनी भर; दररोज सुमारे दीड हजार बॉक्‍सची आवक
पुणे - रसायनविरहित गुळाची मागणी वाढत असून, दरवर्षी या मागणीत दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी भर पडत आहे. त्यामुळे त्याचे नवनवीन ‘ब्रॅंड’देखील बाजारात येऊ लागले आहेत.

उसाच्या रसापासून तयार होणारी साखर आणि गूळ यांच्यात तुलना केली तर आहारात गुळाचे महत्त्व अधिक मानले जाते. पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांत गुळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यात रसायनमिश्रीत गुळाचे प्रमाण अधिक आहे; मात्र रसायनविरहित (सेंद्रिय) गूळ शरीराला अधिक चांगला असल्याचे डॉक्‍टर सांगत आहेत. त्यामुळे सेंद्रिय गुळाची मागणी वाढू लागली आहे.

वाढती मागणी आणि ग्राहकवर्ग लक्षात घेऊन तो एक किलो, अर्धा किलो या वजनाच्या प्रमाणात गूळ बाजारात आणला जात आहे. या गुळाचे कोल्हापूर, कराड, पाटण आणि पुणे जिल्ह्यातील केडगाव, यवत भागात उत्पादन वाढू लागले आहे. अनेक व्यापारी आणि शेतकऱ्यांनी स्वत:चे ‘ब्रॅंड’ तयार करून बाजारात आणले आहे. मार्केट यार्ड येथील गूळ बाजारात या प्रकारातील गुळाची दररोज हजार ते दीड हजार बॉक्‍सइतकी आवक होत असते. 

व्यापारी जवाहरलाल बोथरा म्हणाले, ‘‘बाजारात आवक होणाऱ्या एकूण गुळापैकी सेंद्रिय गूळ सात टक्‍क्‍यांच्या आसपास असतो. अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार याची निर्मिती करावी लागते. प्रत्येक ‘ब्रॅंड’ला त्याबाबतचा तपशील छापावा लागतो. स्थानिक बाजारात याची मागणी वाढली असून, मॉलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत आहे. आखाती देशांत याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून, मुंबईतील निर्यातदार त्याच्या आवश्‍यकतेनुसार थेट उत्पादकांकडून या गुळाची खरेदी करून निर्यात करत असतात.’’

या गुळाविषयी जनजागृती झाल्याने मागणी वाढल्याचे नमूद करून व्यापारी निखिल मेहता म्हणाले, ‘‘उत्पादकांना या गुळाचे उत्पादन करताना प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी लागते. स्वत:चे उत्पादन तयार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. गुळाबरोबरच त्याची पावडरही बाजारात येत आहे. दरवर्षी या गुळाच्या मागणीत दहा ते पंधरा टक्के वाढ होत आहे. घाऊक बाजारात या गुळाचा लिलाव होत नाही. त्याचप्रमाणे उत्पादकांकडून थेट माल खरेदी करून वितरकांमार्फत विक्री केली जात आहे.’’

कसा ओळखावा सेंद्रिय गूळ
सेंद्रिय गुळाची चव अधिक गोड असते.
या गुळाचा रंग तांबूस, तर रसायनमिश्रीत गुळाचा रंग पिवळसर असतो.
प्रतिकिलोचे भाव हे सामान्य गुळाच्या तुलनेत १० ते १५ रुपये अधिक असतात. 
गुळाच्या पॅकिंगवर कायद्याने बंधनकारक मजकूरही उत्पादकाने दिलेला असतो.