पालक-कर्मचाऱ्यांमध्ये विद्यापीठात "चकमक'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आज पालकांनी गोंधळ घातल्याचा आरोप करीत तेथील कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत काम बंद केले. त्यानंतर पालकांनी परीक्षा संचालकांकडे तक्रार केल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. या वेळी कर्मचारी आणि पालकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आज पालकांनी गोंधळ घातल्याचा आरोप करीत तेथील कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत काम बंद केले. त्यानंतर पालकांनी परीक्षा संचालकांकडे तक्रार केल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. या वेळी कर्मचारी आणि पालकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागात विद्यार्थ्याच्या पुनर्मूल्यांकनाचा निकाल पाहण्यासाठी एक महिला पालक विद्यापीठात आल्या होत्या. प्रथम त्या पुनर्मूल्यांकन विभागात गेल्या. तेथे निकाल पाहिल्यानंतर विद्यापीठाच्या वटहुकूमानुसार गुणवाढीचा लाभ त्याला मिळून तो उत्तीर्ण होईल का, अशी विचारणा त्यांनी केली. परंतु हे काम पुनर्मूल्यांकन विभागात नव्हे; तर अन्य विभागात होते, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

महिला पालक आणि त्यांच्याबरोबर आलेल्या तरुणाने संबंधित विभागात जाऊन चौकशी केली. या ठिकाणी एका महिला कर्मचाऱ्याबरोबर त्यांचा वाद झाला. त्यांच्यात शाब्दिक चकमक वाढू लागल्याने अन्य कर्मचाऱ्यांनी पालकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला पालकाने अर्वाच्य भाषा वापरली, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी परीक्षा संचालकांकडे केली. या पालक महिलेनेही कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन अवमान केल्याची तक्रार केली आहे.

परीक्षा संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्याकडे कर्मचारी आणि पालक महिला आल्यानंतर त्यांच्या दालनातही शाब्दिक चकमक झाली. "कर्मचारी काम करीत नाहीत, नुसता पगार घेतात,' अशा शब्दांत त्यांनी तक्रार केली. कर्मचाऱ्यांनी ती फेटाळून लावली आणि या महिलेनेच अर्वाच्य भाषा वापरल्याचे चव्हाण यांना सांगितले. या महिलेने सरकारी कामात अडथळा आणला आहे, त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. हे प्रकरण वेगळेच रूप घेईल, याचा अंदाज आल्यानंतर त्या पालक महिलेने तिच्याबरोबर आलेल्या तरुणासह परीक्षा विभागातून काढता पाय घेतला.

डॉ. अशोक चव्हाण म्हणाले, 'पालक आणि विद्यार्थी परीक्षा विभागात येऊन अर्वाच्य भाषा वापरतात. कर्मचाऱ्यांना त्याचा मानसिक त्रास होतो. या प्रकरणात कर्मचारी संतप्त आहेत. त्यांनी गुन्हा नोंदविण्याची लेखी मागणी केल्यास ती पुढील निर्णयासाठी कुलसचिवांकडे पाठविली जाईल. वैद्य नावाच्या महिलेची तक्रारही माझ्याकडे आली आहे.''

Web Title: pune news parent & college employee confussion in university