गल्लीबोळातील पार्किंगमुळे चालणे अवघड!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

शहरातील प्रमुख रस्त्यांलगतची स्थिती; तक्रार करूनही कारवाईकडे दुर्लक्ष

पुणे - शहरातील गल्लीबोळ अतिक्रमणांनी व्यापत असतानाच, एकेरी पार्किंग असलेल्या रस्त्यांवर सर्रास दोन्ही बाजूंनी बेकायदा दुचाक्‍या उभ्या केल्या जात असल्याचे आढळून येत आहे. परिणामी, बाजारपेठांमधील रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा नसते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.  

शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळाच्या रस्त्यावर सम आणि विषम तारखेनुसार पार्किंगची सोय केली आहे. त्यानुसार फलक उभारले आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करीत अनेक वाहनचालक दोन्ही बाजूला वाहने उभी करीत असल्याचे दिसून आले आहे. ज्या भागात बाजारपेठ आहे, त्या ठिकाणी सकाळपासूनच रस्त्यांच्या दोन्ही बाजूला दुचाकींची गर्दी असते. तांबडी जोगेश्‍वरी येथील बोळात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याबाबत महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत; परंतु त्यावर कारवाई झालेली नाही. 

इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची बाजारपेठ असलेल्या जुन्या तपकीर गल्लीतही हीच परिस्थिती आहे. येथील सर्वच रस्त्यांवर वाहने बेकायदा उभी करण्यात येतात. काही महिन्यांपूर्वी अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली. मात्र, ती थंडावल्यानंतर पुन्हा वाहने लावली जात असल्याची तक्रार आहे. 
याबाबत रहिवासी मधुकर सपकाळे म्हणाले, ‘‘बाजारपेठ असली तरी परिसरात लोकवस्ती आहे. त्यामुळे नागरिकांचा वावर असतो; परंतु बेकायदा वाहने उभी असल्याने सकाळपासूनच रस्त्यावरून चालणे अशक्‍य होते. ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते.’’