पीएफ कार्यालयात पेन्शनरांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

आधार जोडणी न केलेल्यांचे निवृत्तिवेतन बंद

पुणे - केंद्र सरकारच्या आदेशानुसार निवृत्तिवेतनधारकांना ‘आधार’ आणि ‘जीवनपत्र’ जोडणी करणे बंधनकारक आहे; परंतु प्रकृती अस्वास्थ्य, अपंगत्वामुळे ही प्रक्रिया न करू शकलेल्या बहुतांश पेन्शनरांची पेन्शन बंद करण्यात आली. त्यामुळे ही प्रक्रिया करण्यास बॅंकांनी नकार दिल्याने पीएफ कार्यालयात बुधवारी प्रचंड गर्दी झाली.

यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ नागरिक दिनेश पिल्ले म्हणाले, ‘‘मी एका खासगी कंपनीत होतो. निवृत्त होऊन दहा वर्षे झाली. आधार आणि जीवनपत्र जोडणी करण्यासंदर्भात माहितीच नव्हती, पेन्शन बंद झाल्यामुळे बॅंकेत गेलो. त्यांनी पीएफ कार्यालयात पाठविले.’’

रत्नाबाई गायकवाड म्हणाल्या, ‘‘पतीच्या निधनानंतर मला निम्मी पेन्शन मिळते. बॅंकेत गेले तर त्यांनी गोळीबार मैदान कार्यालयात जायला सांगितले.’’ भविष्य निर्वाह निधी पुणे कार्यालयात सध्या पेन्शनरांचे ऑफलाइन फॉर्म घेऊन माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. संगणकावर नोंदींचे काम तीन कर्मचारी करत आहेत. 

पीएफ कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेन्शन खात्यांना आधार आणि जीवनपत्र जोडणी करून पीएफ कार्यालयांकडे पाठविणे ज्या त्या बॅंकांची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांना सेवा शुल्कदेखील दिले जाते. या गोंधळापूर्वी सर्व बॅंक व्यवस्थापकांना बैठक घेऊन पूर्वकल्पना दिली होती; परंतु त्यांच्याकडून सहकार्य केले जात नसल्याने सेवा शुल्क रद्द करण्याची शिफारस केली आहे. दरम्यान, या संदर्भात पीएफचे प्रादेशिक आयुक्त अरुण कुमार आणि वैशाली दयाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

वृद्ध, अपंग पेन्शनरांचे हाल
राष्ट्रीयीकृत बॅंका सर्व निवृत्तिवेतनधारक आणि वारसदारांना जोडणी प्रक्रियेसाठी पीएफ कार्यालयात पाठवत आहेत. गतवर्षी सप्टेंबरपासून ही प्रक्रिया सुरू झाली; परंतु वयोमान, अपंगत्वामुळे ही प्रकिया करू न शकल्याने मे महिन्यापासून पेन्शन रोखण्यात आली आहे. या गोंधळामध्ये वृद्ध, अपंग पेन्शनरांचे अतोनात हाल होत आहेत.