महापालिकेच्‍या कार्यक्रमाला नगरसेवकांचीच दांडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुसळधार पावसामुळे दुचाकी रॅलीसाठी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची अपेक्षित संख्या गाठता आली नाही; तसेच रविवारी सकाळी संघपरिवारातील समन्वयाबाबत एक बैठक होती. त्यामुळे काही नगरसेवक तेथे गेले होते. या रॅलीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवक आणि गटनेत्यांनाही आमंत्रित केले होते; परंतु पावसामुळे सर्वांचाच नाइलाज झाला.
- मुक्‍ता टिळक, महापौर

पुणे - गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा होत असून, त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी महापालिकेतर्फे रविवारी सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली. मात्र, उपमहापौरांसह विविध राजकीय पक्षांचे गटनेते आणि बहुसंख्य नगरसेवकांनी या रॅलीकडे पाठ फिरविल्याने महापौर मुक्ता टिळक यांच्या नेतृत्वाखाली मोजक्‍याच नगरसेवकांच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली.

शहरातील गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे महापालिकेने यंदा सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत रविवारी सकाळी आठ वाजता दुचाकींची रॅली आयोजित केली होती. झेंडे, उपरणे, फलक, नऊवारी साडी नेसलेल्या युवती, पारंपरिक वेशातील युवक, भगवे फेटे आदी जय्यत तयारीही केली होती. मात्र, शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाचे त्यावर विरजण पडले. रविवारीही मुसळधार पाऊस होता. पालकमंत्री गिरीश बापट सकाळी आठच्या सुमारास सर्वप्रथम महापालिकेच्या आवारात पोचले. पाठोपाठ महापौर टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आले. बापट सुमारे पाऊण तास थांबल्यावर पावणे नऊच्या सुमारास पुढच्या कार्यक्रमाला रवाना झाले. त्यानंतर नऊच्या सुमारास महापौरांनी झेंडा दाखविल्यावर रॅलीला सुरवात झाली.

तत्पूर्वी पालकमंत्री, महापौर, सभागृहनेते यांची रॅलीच्या नियोजनासंदर्भात सकाळी साडेसहा-सातच्या सुमारास चर्चा झाली. पावसामुळे रॅली रद्द करण्याऐवजी जेवढे नगरसेवक, कार्यकर्ते येतील त्यांच्यासह पावसातच रॅली काढण्याचे ठरले. रॅलीसाठी भाजपच्या सर्व म्हणजे ९८ नगरसेवकांनी उपस्थित राहावे म्हणून पक्षाने त्यांना वारंवार निरोप दिले होते. नगरसेवकांनी त्यांच्यासमवेत किमान ५-१० कार्यकर्त्यांना घेऊन यावे, असेही बजावण्यात आले होते. मात्र, पावसाचा रागरंग पाहून बहुतांश नगरसेवक घरातच थांबले. 

उपमहापौर धेंडे, पक्षाचे स्थायी समितीमधील नगरसेवक, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा समिती, विधी समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवकही अनुपस्थित होते. इतर पक्षांचे गटनेते आणि नगरसेवकांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली आणि अन्य अधिकारी उपस्थित होते; तर आयुक्त अनुपस्थित होते.

अनुपस्थित नगरसेवकांचीच चर्चा
‘किमान पक्षाचे नगरसेवक तरी दुचाकीवर रेनकोट घालून आले असते तरी, गर्दी दिसली असती,’ अशी प्रतिक्रिया पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. रॅलीचा समारोप केसरीवाड्यात झाला. तेथे नाश्‍त्यासाठी पुरी-भाजी, लाडू यांची किमान एक हजार लोकांसाठी तयारी करण्यात आली होती. परंतु, ३००-४०० लोकांचीच रॅली झाल्यामुळे उर्वरित न्याहारी विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये वाटण्यात आली. रॅली आटोपली तरी, शिस्तबद्ध पक्षाचे नगरसेवक एवढ्या मोठ्या संख्येने अनुपस्थित राहिले कसे, अशी चर्चा पक्षाच्या कार्यकर्त्यांत होती.

Web Title: pune news pmc corporator