संथ वाहतो महापालिकेचा कारभार!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

पुणे - मुळा-मुठा नदीसुधार योजनेचा वेगवेगळ्या पातळ्यांवर गाजावाजा होत आहे. मात्र या योजनेच्या निविदाप्रक्रियेसाठी सल्लागार नेमण्याचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. केंद्रीय मंत्र्याने लक्ष घातल्यानंतरही सल्लागार नेमण्याबाबत महापालिका स्तरावर कार्यवाही होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, योजनेचे काम लांबणीवर पडणार आहे. येत्या १५ डिसेंबरपर्यंत सल्लागाराची नेमणूक करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र त्यासाठी प्राथमिक कामे झाली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

या योजनेसाठी ९९० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, अंमलबजावणी महापालिकेपासून केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर मोठा गवगवा करण्यात आला. महापालिका निवडणुकीनंतर म्हणजे मार्चपासून या योजनेला गती देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते; परंतु गेल्या वर्षीपासून योजनेच्या निविदाप्रक्रियेसाठी सल्लगाराची साधी नियुक्तीही झालेली नाही. 

पहिला टप्पा म्हणून केंद्र सरकारने २६ कोटी रुपये मंजूर केले आहे. मात्र योजना राबविण्याबाबत हालचाली होत नसल्याने हे काम जागेवरच राहिले आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय आणि जपान इंटरनॅशनल कार्पोरेशन एजन्सी (जायका) या संस्थेमार्फत सल्लागार नेमण्यात  येणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात सल्लागाराची नेमणूक केली जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी तीन महिन्यांपूर्वी दिले होते. त्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल; तसेच योजनेतर्गंत बाणेर-बालेवाडीत ३० ऑक्‍टोबरपूर्वी सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे या बैठकीनंतर जाहीर केले होते. 

प्रत्यक्षात गेल्या महिन्यात कोणतीही प्रक्रिया झाली नसून या महिन्यातही सल्लागार नेमण्याबाबत कार्यवाही होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मिळालेला निधी पडून
महापालिकेच्या उत्पन्नात घट होणार असल्याने अनेक योजना रखडण्याची शक्‍यता आहे. मात्र मुळा-मुठा योजनेसाठी निधी असातानाही ती राबविण्याबाबत महापालिका पावले उचलत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी सुमारे २६ कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र काम सुरू करण्याच्या हालचाली होत नसल्याने हा निधी केंद्र सरकारकडे पडून आहे.

मुळा-मुठा नदीसुधार योजनेच्या निविदांसाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक केली जाईल. त्यासाठी आवश्‍यक ती प्रक्रिया सुरू आहे. आगमी दिवासांमध्ये सल्लागाराची नियुक्त होऊन या कामाला गती मिळेल. 
-व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Web Title: pune news PMC Mula-Mutha River