'PMP'च्या 350 भाडोत्री बससेवा अचानक बंद!

ज्ञानेश्‍वर बिजले
गुरुवार, 29 जून 2017

कंत्राटदारांना अचानकपणे गाड्या बंद करता येत नाहीत. त्यांच्याविरुद्ध नियमानुसार आणि करारातील अटीनुसार कारवाई करण्यात येईल. त्यांना तातडीने नोटीसही बजावली आहे, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

​पिंपरी : पीएमपीला भाडेतत्वाने बससेवा पुरविणाऱया कंत्राटदारांनी गुरुवारी दुपारी दोन आणि तीनपासून त्यांच्या सुमारे 350 गाड्या अचानक बंद केल्या. त्यामुळे बससेवा मोठ्या प्रमाणात विस्कळित झाली. ती सुरळित करण्यासाठी पीएमपी प्रशासनाची धावपळ सुरू आहे.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे म्हणाले, की कंत्राटदारांनी आम्हाला काहीही कळविलेले नाही. मात्र मार्गावरील गाड्या चालविण्याचे त्यांनी बंद केल्याची माहिती आमच्या अधिकाऱयांकडून कळाली आहे. पीएमपीच्या जास्तीत जास्त गाड्या मार्गावर पाठविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्या बाराशे गाड्या मार्गावर सुरू आहेत.

कंत्राटदारांना अचानकपणे गाड्या बंद करता येत नाहीत. त्यांच्याविरुद्ध नियमानुसार आणि करारातील अटीनुसार कारवाई करण्यात येईल. त्यांना तातडीने नोटीसही बजावली आहे, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
कंत्राटी गाड्यांच्या चालकांनी बसथांब्यावर गाड्या न थांबविल्यास त्यांना दंड करण्यात येतो. त्यामुळे चालकांनी स्वतःहून गाड्या चालविण्याचे थांबविले असल्याचे कारण कंत्राटदारांनी कळविले असल्याचे समजते. बसमार्गावर सकाळी गेलेल्या कंत्राटदारांच्या गाड्या सायंकाळी सहापर्यंत सुरू राहतील. त्यानंतर त्याही बंद केल्यास बससेसवेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याला तोंड देण्यासाठी पीएमपी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.