विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारावी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पुणे - ""नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस तत्पर आहेतच. पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत सजग असले पाहिजे; परंतु विद्यार्थ्यांचा सर्वाधिक वेळ शाळा-महाविद्यालयांमध्ये जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शिक्षकांचीही तेवढीच असून, शाळा-महाविद्यालयांनी ती स्वीकारून उपाययोजना कराव्यात,'' असे आवाहन पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी केले. 

पुणे - ""नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस तत्पर आहेतच. पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत सजग असले पाहिजे; परंतु विद्यार्थ्यांचा सर्वाधिक वेळ शाळा-महाविद्यालयांमध्ये जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शिक्षकांचीही तेवढीच असून, शाळा-महाविद्यालयांनी ती स्वीकारून उपाययोजना कराव्यात,'' असे आवाहन पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी केले. 

दिल्ली येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्याचा नुकताच खून झाला. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शुक्‍ला यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि "पोलिसकाका' उपक्रमाबाबत शिक्षकांशी संवाद साधला. नेहरू मेमोरिअल सभागृहात मंगळवारी आयोजित या कार्यक्रमास पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सुधीर हिरेमठ, दीपक साकोरे, डॉ. बसवराज तेली, सहायक आयुक्‍त गणेश गावडे, पोलिस निरीक्षक यांच्यासह विविध शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी पोलिस आयुक्तांनी शाळांच्या प्रतिनिधींची मते जाणून घेतली. तसेच शिक्षकांनी केलेल्या सूचनांबाबत कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. 

शुक्‍ला म्हणाल्या, ""शाळेतील शिक्षकांसोबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही चारित्र्य पडताळणी करून घ्यावी. शाळा-महाविद्यालयांनी दर सहा महिन्यांनी सुरक्षा ऑडिट करून घ्यावे. शाळांच्या आवारात, स्वच्छतागृहाकडे जाणाऱ्या व्हरांड्यात तसेच स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही बसवावेत. तसेच सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाचा दररोज आढावा घ्यावा. विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्वच्छतागृह स्वतंत्र असावेत. कर्मचाऱ्यांना ओळखपत्राशिवाय, तर अनोळखी व्यक्‍तींना शाळांमध्ये प्रवेश देऊ नये. स्कूलबसला जीपीएस सिस्टिम बसवून त्यात महिला कर्मचारी नेमावेत. वाहतूक सुरक्षा समितीच्या बैठकांना वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. तसेच पालक-शिक्षक संघटनेच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजनांची माहिती पालकांना देण्यात यावी. विद्यार्थ्यांनी काही अडचण असल्यास थेट पोलिसकाकांना फोनवर संपर्क साधावा. पोलिस त्यांच्या मदतीला धावून येतील. शहरात सध्या एक हजार शाळांमध्ये पोलिसकाका उपक्रम सुरू आहे. या महिन्यात सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू होईल.'' 

सहआयुक्‍त कदम म्हणाले, ""विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पोलिस, पालक आणि शिक्षकांनी संवेदनशील असले पाहिजे. विद्यार्थ्यांबाबत एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतर आपले डोळे उघडतात. त्यामुळे घटना घडण्यापूर्वीच त्यांच्या सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.'' 

प्रास्ताविकात डहाणे म्हणाले, ""मुलांच्या जडणघडणीत शाळा-महाविद्यालयांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. मुलांच्या सुरक्षेबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिस आयुक्‍तांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.'' सूत्रसंचालन रूपाली देशमुख यांनी केले, तर सहायक आयुक्‍त संजय निकम यांनी आभार मानले. या वेळी एस. पी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोलिसकाकांची कशी मदत मिळते, यावर पथनाट्य सादर केले. 

सर्व शाळांमध्ये सायबर प्रशिक्षण 
सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर गुन्हे शाखेच्या वतीने ऑक्‍टोबर महिन्यात सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. सायबरतज्ज्ञांकडून त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याचे सुधीर हिरेमठ यांनी सांगितले.

Web Title: pune news Police Commissioner Rashmi Shukla school