कर्तव्यदक्ष अधिकारी : दयानंद गावडे

युनूस तांबोळी
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

वारकरी संप्रदायातील पायी वारी करण्याकडे आई- वडिलांचा नेहमी कल होता. त्यामुळेच अंगात सुसंस्कृतपणा जोपासला गेला. देव, देश अन्‌ धर्मासाठी व समाजासाठी काहीतरी करून दाखविण्याची जिद्द होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी पोलिस खात्यात काम करण्याची संधी मिळत गेली. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करत असताना खात्याशी प्रामाणिकपणा जपला. त्यामुळेच पोलिस निरीक्षक दयानंद सदाशिव गावडे यांना "पुणे ग्रामीण'च्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात काम करण्याची संधी प्राप्त झाली.

वारकरी संप्रदायातील पायी वारी करण्याकडे आई- वडिलांचा नेहमी कल होता. त्यामुळेच अंगात सुसंस्कृतपणा जोपासला गेला. देव, देश अन्‌ धर्मासाठी व समाजासाठी काहीतरी करून दाखविण्याची जिद्द होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी पोलिस खात्यात काम करण्याची संधी मिळत गेली. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करत असताना खात्याशी प्रामाणिकपणा जपला. त्यामुळेच पोलिस निरीक्षक दयानंद सदाशिव गावडे यांना "पुणे ग्रामीण'च्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात काम करण्याची संधी प्राप्त झाली. अवघ्या दोन महिन्यांत केलेल्या कामगिरीमुळे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

सातारा जिल्हा, फलटण तालुक्‍यातील गणवरे गावी गावडे यांचा शेतकरी- वारकरी कुटुंबात जन्म झाला. लहानपणापासून हट्टी स्वभाव असल्याने कोणतेही काम करण्याचे ठरविले, की त्याचा शेवट करत असत. गावातच मराठी शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. आई-वडील नेहमी वारीसाठी पायी दिंडीत सामील होतात. त्यामुळे लहानपणापासून त्यांच्यावर वारकऱ्यांचे संस्कार झाले. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द मनाशी बाळगली. त्यातून त्यांनी एम.एस्सी. ऍग्री.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

पहिल्याच प्रयत्नात 1996 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. प्रशिक्षणानंतर मुंबई पोलिस दलात त्यांची फौजदारपदावर नियुक्ती झाली. मुंबई पोलिस खात्यात देखील त्यांची कामगिरी उत्तम राहिली. त्यामुळेच त्यांनी बारा वर्षांचा कालावधी या परिसरात घालवला. गुन्ह्याची उकल करून अपराध्यांना अटक करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे मुंबई गुन्हेगारीविश्वात त्यांचा चांगलाच दरारा निर्माण झाला होता. त्यानंतर 2008 मध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे सहायक पोलिस निरीक्षक या पदावर बढती झाली. या परिसरात असणाऱ्या सागरी गुन्ह्यांचा छडा त्यांनी लावला. या ठिकाणी त्यांना अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या चांगल्या कामगिरीची पोलिस खात्याकडून नेहमीच दखल घेण्यात आली. त्यामुळेच 2011 मध्ये त्यांना पोलिस निरीक्षक म्हणून सोलापूर जिल्ह्यात बढती मिळाली. गुन्ह्याचा तपास करून आरोपीला गजाआड घालायचेच, हा त्यांचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा होता. मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांची त्यांनी गय केली नाही. त्यामुळेच साडेचार वर्षे त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठांचा पाठिंबा त्यांना मिळाला.

मे 2016 मध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील पोलिस ठाण्याला त्यांची नियुक्ती झाली. या काळात चांगले- वाईट प्रसंग त्यांच्या नशिबात आले. शिरूर शहरात वाहतूक सुरळीत करण्यात त्यांना यश आले. कमी पोलिस कर्मचारी असतानाही संपूर्ण तालुक्‍यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यात त्यांना यश आले. एका वर्षात सुसज्ज संगणकीय पोलिस ठाणे तयार केले. त्यांची चांगली कामगिरी पाहून पुणे ग्रामीणला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. गेल्या दोन महिन्यांत त्यांनी चार खुनाच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. लोणावळा येथील कॉलेजमधील एक तरुण व तरुणीच्या खुनाचा गुन्हा महत्त्वाचा होता. चाकण, खेड व यवत येथील गुन्ह्यांचा तपास त्यांनी केला. याच काळात जबरी चोरीचे चार गुन्हे, गुन्ह्यांमधील 141 आरोपींना अटक केली. 20 घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास केला. 9 चोरीचे गुन्हे, तसेच लोणीकंद व शिक्रापूर येथील डिझेल चोरीचा तपास त्यांनी केला. दोन महिन्यांत यशस्वी कामगिरी केल्यामुळे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला आहे. योग्य तपास करत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठांनी कौतुकाने थोपटलेली पाठ हा क्षण त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो.

पोलिस हा समाजासाठी न्याय मिळवून देताना कर्तव्य करणारा असतो. अशावेळी नागरिकांनी त्याला पाठबळ देणे अपेक्षित असते, असेही ते सांगतात.