रंगरेषांतून साकारले व्यक्‍तिचित्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

पुणे - समोर बसलेल्या ज्येष्ठ व्यक्तीचे चित्र रंगरेषांच्या माध्यमातून हुबेहूब साकारत होते... कधी रंगांची भरण तर कधी रेषांनी व्यक्तिचित्राला मिळत असलेला आकार... हे सारं काही विद्यार्थिनी न्याहाळत होत्या, समजून घेत होत्या. चित्रकार सुहास बहुलकर यांच्या अनोख्या व्यक्तिचित्रांच्या कार्यशाळेत त्या रममाण झाल्या होत्या. व्यक्तिचित्राचा हा प्रवास प्रत्येकीसाठी खास ठरला.

निमित्त होते, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) ‘बॅचलर इन व्हिज्युअल आर्टस’च्या चित्रकला मंडळाच्या उद्‌घाटनाचे. या वेळी बहुलकर यांनी व्यक्तिचित्रे कशी रेखाटतात आणि त्याचे महत्त्व काय, हे समजून सांगितले. ‘हंस’ मासिकाच्या हेमा अंतरकर, चित्रकार प्रा. सुधाकर चव्हाण, डॉ. सुभाष पवार, प्राचार्य डॉ. आनंद जुमळे, विभागप्रमुख डॉ. राजेत्री कुलकर्णी उपस्थित होते.

बहुलकर म्हणाले, ‘‘चित्रकलाविषयक लेखनाचे आणि चित्रांचेही आज डॉक्‍युमेंटेशन होण्याची गरज आहे आणि ही आपली जबाबदारी आहे. तरुण लेखकांनीही चित्रकलेविषयी लिहिले पाहिजे. चित्रकला विषयाचे वाचक जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यासाठी लेखन करावे.’’

चित्रकलेत चूक किंवा बरोबर असे काही नसते. चित्रकलेची वेगळी दुनिया असून, ती चांगल्या रीतीने रसिकांपर्यंत पोचावी, ही आपली जबाबदारी आहे. कोणतीही कला फसता कामा नये, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर कलेचा पुरेपूर आनंदही घेतला पाहिजे. आपल्याला वाटेल तसा कलेला आकार द्यावा, तोच खरा आनंद आहे.
- सुहास बहुलकर, चित्रकार