पुणे-मुंबई रेल्वेची बिकटवाट

खंडाळा - लोहमार्ग तसेच लांब पल्यांच्या गाड्यांवर दरड कोसळण्याचा धोका संभावतो.
खंडाळा - लोहमार्ग तसेच लांब पल्यांच्या गाड्यांवर दरड कोसळण्याचा धोका संभावतो.

मुंबईहून पुण्याकडे येत असताना खंडाळ्याजवळ सिंहगड एक्‍स्प्रेसच्या ट्रॅकवर दगड आला होता. मात्र, मोटरमनने वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर काही दिवसातच कोयना एक्‍स्प्रेस पुण्याकडे येत असताना मंकी हिलजवळ रेल्वे ट्रॅक खचल्याची घटना घडली. ऐन पावसाळ्यात झालेल्या या दोन्ही घटनांचा विचार केल्यास पुणे-मुंबई दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा चर्चेचा ठरला आहे. पुणे-खंडाळा दरम्यान धोकादायक ठिकाणी लोहमार्गाच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत आढळले.
 

दृष्टिक्षेपात लोहमार्गाची पाहणी
पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा सुरू होऊन दीडशे वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. या मार्गाचे सेफ्टी ऑडिट रेल्वेने केले आहे का?, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.
तळेगाव स्टेशनजवळ ट्रॅकच्या दोन्ही बाजूस टेकडीवर मातीचे थर साठले आहेत. पावसाळ्यात ते खचून लोहमार्गावर येण्याची शक्‍यता आहे. 
कामशेत रेल्वेस्टेशन इंद्रायणी नदीलगत आहे. पावसाळ्यात तिथे मोठ्या प्रमाणात पाणी येते. त्यामुळे रेल्वे ट्रॅक खचण्याची शक्‍यता आहे. 
खामशेत परिसरातील रेल्वे ट्रॅकलाही नदीच्या पुराचा धोका आहे. त्याकडेही रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसते. 
खंडाळा घाटात क्रॉसिंगजवळ डोंगराची कडा व ट्रॅकमध्ये कमी अंतर आहे. याठिकाणी सुरक्षा जाळी बसविलेली नसल्याने दरड कोसळण्याची शक्‍यता आहे. 
खंडाळा परिसरात बॅटरी हिलजवळ डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी थेट रेल्वे ट्रॅकवर येते. सततच्या पाण्यामुळे ट्रॅक खालील भूभाग खचू शकतो. 
रेल्वे प्रशासनाने पुणे ते खोपोली मार्गाचे सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले.

पावसाळ्यापूर्वीच तपासणी : रेल्वेचा दावा 
पावसाळा सुरू होण्याअगोदर दरवर्षी पुणे-लोणावळा दरम्यान लोहमार्गाची पूर्णपणे तपासणी केली जाते. धोकादायक व अडचणीच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना केली जाते. कामशेतजवळ रेल्वे ट्रॅकवर इंद्रायणी नदीचे पाणी येऊ नये, यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत. डोंगरावरील दगड ट्रॅकवर येण्याची शक्‍यता असलेले एक-दोन ठिकाणे आहेत. तिथे सुरक्षा जाळ्या बसविल्या आहेत, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.

तज्ज्ञांच्या मते...
पुणे- मुंबई लोहमार्गाच्या सर्वेक्षणासंदर्भात रेल्वे प्रशासनाने सांगितल्यास पाहणी केली जाईल. ट्रॅक खचणे, दरड पडण्याचे प्रकार कशामुळे होतात, हे शोधता येईल. अभियांत्रिकी तंत्राचा वापर करून यासंदर्भातील नेमका निष्कर्ष काढता येणे शक्‍य होईल.
- सुखानंद भोसले, स्थापत्य विभागप्रमुख, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग

प्रवासी म्हणतात...
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. रेल्वे प्रशासनाने पावसाळा संपल्यानंतर त्यासंदर्भातील सर्वेक्षण करावे आणि उन्हाळ्यामध्ये ते काम पूर्ण करावे. 
- रवींद्र पवार

पुणे- मुंबई लोहमार्गाचे सेफ्टी ऑडिट रेल्वेने करण्याची गरज आहे. सेफ्टी ऑडिटमध्ये आढळणाऱ्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आराखडा तयार करून तत्काळ त्याची अंमलबजावणी केली जावी. 
- दिनेश मराठे

दीडशे वर्षांचा इतिहास
पुणे-मुंबई लोहमार्गाचे काम ग्रेटर इंडियन पेन्युझिला रेल्वे यांच्या मार्गदर्शनाखाली १८५६ मध्ये पूर्ण झाले. खंडाळा घाटातील काम जेम्स बर्कले या इंजिनिअरने केले होते. घाटातील खडक बेसॉल्ट प्रकारचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com