विद्यापीठात आरोग्यविषयक नवा अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांवर भर आहे. न्यूट्रिशन, डायटेटिक्‍स किंवा आरोग्यशास्त्राशी निगडित कोणत्याही शाखेमधील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतील. या विषयामध्ये रुची असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये "सर्टिफिकेट कोर्स ऑन इंटिग्रेटिव्ह डायटेटिक्‍स' हा नवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होणार आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत चालणाऱ्या या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्यासाठी आवश्‍यक आहारविषयक नियोजन, एकात्मिक आहारशास्त्राच्या मदतीने आजारांपासून बचाव आणि नियंत्रणासाठी आवश्‍यक कौशल्यांचा विकास करण्याची संधी मिळणार आहे.

उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेद, योग आदी पारंपरिक भारतीय उपचार पद्धतींद्वारे साध्या, प्रभावी आहार आणि जीवनशैलीवर भर दिला जातो.

आयुर्वेदामध्ये रुग्णाच्या नेमक्‍या गरजा लक्षात घेत, व्यक्तीनुरूप आहारशास्त्राचा विचार केला जातो. आयुर्वेदामधील या ज्ञानाला आधुनिक आहारशास्त्राची जोड मिळाल्यास सध्याच्या वैद्यक आणि आहारशास्त्रविषयक उपचार पद्धतींचा गरजूंना अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. या एकत्रीकरणाच्या माध्यमातून आरोग्यविषयक समस्यांना तोंड देण्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धतीही विकसित करणे शक्‍य होणार आहे. ही गरज ओळखून त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे.

अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांवर भर आहे. न्यूट्रिशन, डायटेटिक्‍स किंवा आरोग्यशास्त्राशी निगडित कोणत्याही शाखेमधील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतील. या विषयामध्ये रुची असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. अभ्यासक्रमाची माहिती विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in. या संकेतस्थळावर दिली आहे. याविषयीच्या अधिक माहितीसाठी ccih.shs@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.