यंदा नगरच "पुरुषोत्तम' ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पुणे - महाविद्यालयीन तरुणांच्या सर्जनासाठीचं हक्काचं व्यासपीठ म्हणून ओळख असणारा यंदाचा पुरुषोत्तम करंडक पुण्याकडून नगरकडे सरकला आहे ! नगरच्या न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेजच्या प्रतीकात्मक रचनांतून सामाजिक भाष्य करणाऱ्या "माईक' या विचारप्रवर्तक एकांकिकेने तो पटकावला आहे. पुण्यातील एकापेक्षा एक तगड्या संघांना टक्कर देत नगरने हा करंडक मिळवल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या यशाचे विशेष कौतुक केले जात आहे. 

या वेळी दुसऱ्या क्रमांकाचा "हरी विनायक करंडक' मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या "एएसएल प्लीज' या एकांकिकेस, तर तृतीय क्रमांकाचा "संजीव करंडक' बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या "सॉरी परांजपे' या एकांकिकेस मिळाला. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी दिला जाणारा "जयराम हर्डीकर करंडक' यंदा कुणालाही देण्यात आला नाही. समर नखाते, अमिता खोपकर आणि मिलिंद फाटक यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. 

आदित्य कुलकर्णी, नाथ प्रसाद पुरंदरे, गंधर्व गुळवेलकर, समृद्धी देशपांडे या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम अभिनयाची पारितोषिके देण्यात आली. सर्वोकृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक ऋषी मनोहर याला देण्यात आले. तर, रत्नदीप शिंदे आणि सूरज गडगिळे यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक विभागून मिळाले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भरत नाट्य मंदिर येथे येत्या 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. 

पंचवीस वर्षांनी "पुरुषोत्तम' पुण्याबाहेर ! 

यंदा नगरच्या दोन महाविद्यालयांच्या एकांकिकांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. गेली अनेक वर्षे नगरमधील महाविद्यालये पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी होत आली आहेत. मात्र, यापूर्वी केवळ दोनच वेळा नगरला पुरुषोत्तमला गवसणी घालता आली आहे. याआधी मैत (1981) आणि कळकीचं बाळ (1982) या एकांकिकांनी पुरुषोत्तम पटकावला होता. त्यानंतर थेट यंदाच पुन्हा एकदा त्यांना हा मान मिळाला आहे. तसेच, 1993 मध्ये संगमनेर महाविद्यालयाने करंडक पटकावला होता. त्यानंतर करंडक पुण्याकडेच राहिला. यंदा मात्र तब्बल पंचवीस वर्षांनी पुरुषोत्तम पुण्याबाहेर गेला !