रब्बीच्या पेरणीला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

यंदा राज्यात 54 लाख 75 हजार हेक्‍टरवर लागवड

यंदा राज्यात 54 लाख 75 हजार हेक्‍टरवर लागवड
पुणे - राज्यात रब्बी पिकांचे क्षेत्रफळ 54 लाख 75 हजार हेक्‍टर इतके असून, सर्वाधिक क्षेत्रफळ असलेल्या पुणे विभागासह नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि लातूर या विभागांमध्ये रब्बी पिकांच्या पेरणीला सुरवात झाली आहे. पेरणी सुरू असलेल्या पिकांमध्ये ज्वारी, मका, हरभरा, तीळ आणि सूर्यफुलाचा समावेश आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, रब्बी हंगामात गेल्या वर्षी (2016-17) ज्वारीची 25 लाख 89 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. सध्या सुमारे 12 टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी मक्‍याची 3.57 लाख हेक्‍टरवर पेरणी झाली होती. या पिकाची पेरणी या वर्षी जास्त आहे. हरभरा, तीळ आणि सूर्यफूल यांची पेरणी प्रत्येकी सुमारे एक टक्का झाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यात पुणे विभागात रब्बी पिकाखालील सर्वाधिक 17.42 लाख हेक्‍टर इतके क्षेत्र असून, या विभागात पेरणीची कामे जोमाने सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे 14 टक्के कामे झाली आहेत.

नाशिकमध्ये रब्बी पिकांखालील क्षेत्र हे 4.03 लाख हेक्‍टर असून, सरासरी दोन टक्के पेरणी झाली आहे. कोल्हापूरमध्ये 5.27 लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी 13 टक्के पेरणी झाली आहे. औरंगाबादमध्ये 6.46 लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी सुमारे सहा टक्के पेरणी झाली आहे, तर लातूरमध्ये 11.54 लाख हेक्‍टर क्षेत्र असून, या विभागात पेरणीची कामे संथगतीने सुरू असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

खरीप पंचनाम्याचा अहवाल सरकारला पाठविणार
परतीच्या मॉन्सूनमुळे राज्यभरात 12 हजार हेक्‍टरहून जास्त पीकक्षेत्र बाधित झाले आहे. जिल्हा स्तरावर बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू झाले असून, त्याचा अंतिम अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कृषी आयुक्तालयातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.