रेल्वे स्टेशनवरील जेवणही महागणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे - रेल्वे स्टेशनवर असलेल्या "जन आहार' केंद्रांचे खासगीकरण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दहा ते वीस रुपयांपर्यंत मिळणारे हक्काचे जेवण आता महागणार आहे. 

पुणे - रेल्वे स्टेशनवर असलेल्या "जन आहार' केंद्रांचे खासगीकरण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दहा ते वीस रुपयांपर्यंत मिळणारे हक्काचे जेवण आता महागणार आहे. 

इंडियन रेल्वे केटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) या संदर्भातील निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच या केंद्राच्या जागी नवीन फूडप्लाझा उभे राहणार आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांचे दरदेखील वाढणार आहेत. प्रवाशांना स्वस्तात जेवण मिळावे, यासाठी 1956मध्ये रेल्वे प्रशासनाने स्टेशनवर खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली होती; तसेच सर्वसामान्य नागरिकांना हे खाद्यपदार्थ रास्त दरात उपलब्ध व्हावेत, यासाठी "जन आहार' केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला होता. त्यानुसार दहा रुपयांना पुरी आणि बटाटा भाजी या केंद्रात मिळत होती. कालांतराने त्यांचे दर वाढून वीस रुपये झाले होते. 

आता मात्र केंद्र बंद करून त्या ठिकाणी "फूडप्लाझा' सुरू करण्याचा निर्णय "आयआरसीटीसी'ने घेतला आहे. त्यानुसार पश्‍चिम आणि मध्ये रेल्वेच्या सर्व स्टेशनवरील या केंद्रांच्या जागी आता हे "प्लाझा' दिसणार आहेत. दरम्यान "आयआरसीटीसी'ने घेतलेल्या निर्णयास रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी विरोध केला आहे. सर्वसामान्य नागरिकांची त्यामुळे गैरसोय होणार आहे.