पुणे - सौराष्ट्र व लगतच्या गुजरातच्या उत्तरेकडील भागावर कमी दाबाचे क्षेत्र कच्छ व लगतच्या पाकिस्तानचा दक्षिण भाग आणि अरबी समुद्राच्या ईशान्य भागाकडे सरकले आहे. तसेच कर्नाटक ते केरळ किनारपट्टीवर असलेले द्रोणीय क्षेत्र विरून गेले आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असून अनेक भागांत पावसाने उघडीप दिली.
कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी येत्या सोमवारपर्यंत (ता. 4) हलका पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील. आज कोकणातील बहुतांशी ठिकाणी हलका पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. कोकणातील काही ठिकाणी बुधवारी जोरदार पाऊस पडला असून अनेक ठिकाणी हलक्या पावसाची रिमझिम सुरू होती.
कोकणात गुरुवारी अधूनमधून सरी बरसत होत्या. मध्य महाराष्ट्रातील इगतपुरी, लोणावळा, राधानगरी, मावळ, वेल्हा, भोर, मुळशी व महाबळेश्वर परिसरात हलका पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते, तर काही ठिकाणी सकाळपासून उन्ह पडत होते.
|